ओटीटी’वर दाखवली जाणारी अश्‍लील दृश्ये, नग्नता, शिवीगाळ हे थांबायला हवे ! – सलमान खान, अभिनेते

अभिनेता सलमान खान

मुंबई – मला खरोखर असे वाटते की, ‘ओटीटी’वर (चित्रपट आदी पहाण्याच्या ऑनलाईन माध्यमावर) कुणाचा तरी अंकुश असावा. त्यात दाखवली जाणारी अश्‍लील दृश्ये, नग्नता, शिवीगाळ हे थांबायला हवे. सध्या १५-१६ वर्षांची मुलेही हे बघतात. अभ्यासाच्या नावाखाली एखाद्या १६ वर्षांच्या मुलीने भ्रमणभाषवर हे सगळे पाहिल्यावर ते तुम्हाला तरी आवडणार आहे का ? ‘ओटीटी’वर येणारी प्रत्येक गोष्ट पडताळली गेलीच पाहिजे. ‘कंटेंट’ (आशय) जेवढा स्वच्छ असेल, तेवढा तो पहाण्यासाठी लोक तेवढीच गर्दीही करतील, असे विधान अभिनेता सलमान खान यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

‘मध्यंतरी चित्रपटातही असे प्रकार पहायला मिळत होते; पण आता प्रमाण थोडे न्यून झाले आहे. आपण भारतात रहातो, आपल्या मर्यादा आपल्याला लक्षात यायला हव्यात. आता हळूहळू लोक चांगल्या ‘कंटेंट’कडे वळू लागले आहेत, ही चांगली गोष्ट आहे.

संपादकीय भूमिका

खान यांनी जे विधान केले आहे, ते योग्यच आहे; मात्र ते रोखण्यासाठी ते पुढाकार घेणार का, हेही त्यांनी सांगावे !