वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुखपट्टीचा (मास्क) उपयोग करणे बंधनकारक ! – रूचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, सातारा

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, ५ एप्रिल (वार्ता.) – राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वसिद्धता आणि उपाययोजना करण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यांतील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना काळजी घेण्यासाठी मुखपट्टीचा (मास्कचा) उपयोग करण्याचे आदेश दिले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी उदा. आठवडा बाजार, एस्.टी. स्टँड परिसर, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येण्याची ठिकाणे या सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मुखपट्टीचा (मास्कचा) उपयोग करावा. सामाजिक अंतर ठेऊन वेळोवेळी सॅनिटायझरचा उपयोग करावा.

३ एप्रिल या दिवशी जिल्ह्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या ३ लाटा येऊन गेल्यानंतरही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ३ एप्रिल या दिवशी सातारा जिल्ह्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५० हून अधिक आहे. प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मुखपट्टी, सॅनिटायझर यांचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.