युवकांना करणार प्रशिक्षित !
मुंबई – जर्मनीमध्ये प्रतिवर्षी विविध कौशल्ये असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित लोकांची कमतरता भासते. जर्मनीची मनुष्यबळाची ही आवश्यकता महाराष्ट्र पूर्ण करू शकतो, अशी अपेक्षा जर्मनीचे वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे व्यक्त केली. चेन्नई येथे जर्मनीचे वाणिज्यदूत म्हणून दायित्व पहाणारे एकिम फॅबिग यांची मुंबई येथे वाणिज्यदूत म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर फॅबिग यांनी ३ एप्रिलला राजभवन येथे राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली.
जर्मनीला परिचारिका, इलेक्ट्रिशिअन, सोलर युटिलिटी तंत्रज्ञ आदी क्षेत्रात तातडीने मनुष्यबळाची आवश्यता आहे. ‘माझ्या कार्यकाळात मी जर्मनीची कौशल्याची आवश्यकता आणि भारताकडील मनुष्यबळ यांची सांगड घालण्यावर भर देईन’, असे फॅबिग यांनी सांगितले. यावर राज्यपाल रमेश बैस यांनी फॅबिग यांना ‘महाराष्ट्रात नव्यानेच ‘राज्य कौशल्य विद्यापीठ’ स्थापन करण्यात आले आहे. यात जर्मनीने विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी सहकार्य केल्यास जर्मनीची प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण होईल’, असे सांगितले.
जर्मनीची ८०० आस्थापने भारतात काम करत असून त्यांपैकी किमान ३०० आस्थापने पुणे येथे आहेत. जर्मनीतून येणार्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. जर्मनीने मुंबई आणि नागपूर येथील मेट्रो प्रकल्पासाठी ५०० दशलक्ष युरो इतकी गुंतवणूक केली आहे. सद्यःस्थितीत ३५ सहस्र भारतीय विद्यार्थी जर्मनी मध्ये शिकत आहेत. यावर्षी जर्मनीला २०० परिचारकांची आवश्यकता आहे. यादृष्टीने केरळ येथील एका नर्सिंग कॉलेजसमवेत करार करण्यात आला असल्याचे या वेळी एकिम फॅबिग यांनी सांगितले.
भारतातील ग्रामीण भागांत जर्मनी देणार फुटबॉलचे प्रशिक्षण !‘भारतात फुटबॉल प्रचलित करण्यासाठी जर्मनीचा प्रसिद्ध ‘बायर्न म्युनिक’ या फुटबॉल क्लबकडून भारतातील ग्रामीण भागांत फुटबॉल प्रशिक्षण शिबिरे आणि स्पर्धा यांचे आयोजन केले जाईल’, असेही एकिम फॅबिग यांनी या वेळी सांगितले. |