रोशनी शिंदे यांची प्रकृती स्थिर ! – डॉ. उमेश आलेगावकर

ठाणे येथील रोशनी शिंदे यांच्या मारहाणीचे प्रकरण

डॉ. उमेश आलेगावकर आणि रोशनी शिंदे

ठाणे – रोशनी शिंदे यांना गंभीर इजा झालेली नाही. त्यांना मुका मार लागला आहे. अंतर्गत रक्तस्राव झालेला नाही. तसेच त्या गर्भवतीही नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉ. उमेश आलेगावकर यांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना येथे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ३ एप्रिल या दिवशी सायंकाळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे. ‘फेसबुक’वरील एका ‘पोस्ट’वरून हा प्रकार घडल्याचे समजते. या प्रकरणी गुन्हा नोंद झालेला नाही. शिंदे गटावर गुन्हा नोंद होण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या बाहेर जमले होते; परंतु रोशनी शिंदे यांच्यावरच गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी रोशनी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांना अडकवण्यासाठी कट रचला जात आहे ! – मीनाक्षी शिंदे, माजी महापौर, ठाणे

शिवसेनेच्या नेत्या आणि ठाण्ो येथील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘रोशनी शिंदे यांना मारहाण झालीच नाही’, असे सांगितले आहे. त्या म्हणाल्या, ‘‘ज्या वेळी एखाद्याला मारहाण होते, त्या वेळी गुन्हा नोंद होतो; पण या प्रकरणात तसे झाले नाही. आधुनिक वैद्यांनीही मारहाण झाल्याचे दिसत नसल्याचे सांगितले. त्या गर्भवतीही नाहीत. सहानुभूती मिळवण्यासाठी रोशनी शिंदे यांनी ढोंग केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्यासाठी कट रचला जात आहे.’’