१. व्यवसायामुळे साधनेचे गांभीर्य न्यून होणे आणि काही कारणांनी समष्टी सेवेपासून दूर जाणे
‘मी अनेक वर्षे साधना करत आहे; परंतु मध्यंतरीच्या काळात व्यवसायानिमित्त माझे बाहेर जाणे अधिक झाल्यामुळे माझी सेवा अल्प होऊ लागली आणि माझ्यामधील साधनेचे गांभीर्य न्यून होत गेले. त्यानंतर काही कारणांनी मी समष्टी सेवेपासून दूर गेलो.
२. सेवेपासून दूर गेल्याची खंत वाटून साधकाने केलेले प्रयत्न आणि त्याला आलेल्या अनुभूती
२ अ. ‘गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचा लाभ होणार नाही’, असे कळल्यावर वाईट वाटणे आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रवचने ऐकण्याचे ठरवल्यानंतर अकस्मात् एका साधिकेने ‘गुरुपौर्णिमेचा उत्सव पहाता येईल’, असा निरोप देणे : वर्ष २०२१ मध्ये ‘तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी ऑनलाईन जोडता येणार नाही’, असे मला उत्तरदायी साधकाने सांगितले. त्या वेळी मला पुष्कळ वाईट वाटले. नंतर माझ्या मनात विचार आला ‘आपण सकाळी कार्यालयात गेल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रवचने ऐकूया’, तरीही ‘सकाळी उठल्यावर गुरुपौर्णिमेचा उत्सव पहाण्याच्या संदर्भात निरोप येईल’, असे मला वाटत होते आणि तसेच झाले. माझ्या कार्यालयामध्ये काम करणार्या एका साधिकेने ‘आपल्या कार्यालयात काम करणार्या साधकांना आणि तुमच्या कुटुंबियांना गुरुपौर्णिमेचा उत्सव पहाता येईल’, असा मला निरोप दिला. तेव्हा गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होऊन माझी भावजागृती झाली. त्या वेळी मी ‘पुढील वर्षी गुरुपौर्णिमेच्या वेळी सेवा करायची आहे’, असा मनामध्ये निश्चय केला.
२ आ. गुरुदेवांच्या कृपेमुळे व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यासाठी एका साधकाचे नियोजन होणे : त्यानंतर मी व्यष्टी साधनेची घडी चांगली बसण्यासाठी प्रयत्न करू लागलो. मी ‘स्वतःचा आढावा नियमित लिहून एका खोक्यात घालून गुरुचरणी अर्पण करायचा’, असे ठरवले. त्यानंतर गुरुदेवांच्या कृपेमुळे माझा साधनेचा आढावा घेण्यासाठी मला एका साधकाला जोडून देण्यात आले.
२ इ. ‘सद्गुरु सत्यवान कदम यांचा सत्संग मिळावा’, अशी मनात इच्छा असणे आणि सद्गुरु सत्यवानदादांना रत्नागिरी येथून घेऊन येण्याची सेवा मिळणे : सद्गुरु सत्यवान कदम यांचे लांजा केंद्रात साधकांना मार्गदर्शन असायचे. तेव्हा मी देवापुढे बसून नामजप करत असे. तेव्हा माझ्या मनामध्ये विचार यायचा, ‘आपली साधना वाढली की, आपल्यालाही त्यांचा सत्संग मिळेल.’ त्यानंतर एकदा मला एका साधकाचा भ्रमणभाष आला, ‘सद्गुरु सत्यवानदादांना रत्नागिरी येथून आणायचे आहे. तुम्ही त्यांना आणायला जाऊ शकता का ?’ मी लगेच ‘हो’ म्हणालो.
माझी व्यष्टी साधनेची घडी चांगली बसत होती. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची सारणी नियमित लिहिण्याच्या समवेत व्यष्टी साधनेचा आढावाही नियमित देत होतो; परंतु मला ‘ऑनलाईन’ नामजप, भावसत्संग, शुद्धीसत्संग आणि आठवड्याचा सत्संग यांना जोडले नव्हते. तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला, ‘योग्य वेळ आल्यावर मला सत्संगाचा लाभ होईल. आपण प्रयत्न करत राहूया.’
३. वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी सेवेची संधी मिळणे
अ. मला वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेच्या बैठकीसाठी साधकांना चारचाकीने घेऊन जाण्याची आणि दिंडीच्या वेळीही सेवा मिळाली.
आ. पुढे काही दिवसांनी मला सत्संगाला बोलावले. त्यामध्ये मला गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या वेळी सभागृहाची सजावट करण्याची सेवा मिळाली.
मी मिळेल, ती सेवा स्वीकारत होतो. गुरुपौर्णिमा जवळ आल्यावर साधकसंख्या अल्प असल्याने मला अनेक सेवा मिळत गेल्या आणि मी त्या केल्या. मला सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळत होता. १३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सव झाला. तेव्हा मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली; कारण वर्ष २०२१ मध्ये मी जे स्वप्न पाहिले होते, ते गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने पूर्ण झाले होते. पुढे गुरुपौर्णिमेनंतर झालेल्या सत्संगामध्ये मला ‘ऑनलाईन’ व्यष्टी आढाव्याला जोडून देण्यात आले.
४. सेवेचे दायित्व घेणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने ‘आपण आपली व्यष्टी आणि समष्टी साधना प्रामाणिकपणे करून आध्यात्मिक प्रगती साधायची’, हे ध्येय ठेवून त्यानुसार मी सेवेचे दायित्व घेऊ लागलो. ‘माझ्या साधनेची घडी व्यवस्थित बसून मला सेवा मिळावी, यासाठी साधकांनी पुष्कळ प्रयत्न केले. रामनाथी आश्रमात असलेली माझी बहीण कु. कल्याणी गांगण हिने मला सातत्याने मार्गदर्शन केले. यामुळे माझी साधना चांगल्या प्रकारे चालू झाली. त्यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
५. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती
अ. मी माझ्या कुटुंबियांच्या समवेत एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये वास्तव्याला आलो होतो. आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्यानंतर मला सतत कृतज्ञता वाटून माझी भावजागृती होत होती.
आ. प.पू. दास महाराज यांची भेट झाली. तेव्हा ‘आपण प्रत्यक्ष मारुतिरायांना भेटत आहोत’, असे मला वाटत होते.
इ. एकदा आमची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी भेट झाली. तेव्हा ‘प्रत्यक्ष देवीच समोर उभी आहे’, असे मला जाणवले. त्यांनी आम्हाला साधनेचे आणि स्वभावदोष अन् अहं-निर्मूलन प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व सांगितले. त्यांच्याकडून सतत सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत होती. त्यांचा चेहरा गुलाबी दिसत होता.
ई. रामनाथी आश्रमात असलेल्या देवीचे (श्री भवानीमातेचे) दर्शन घेतांना ‘ती आपल्या मनामधील सर्वकाही ऐकत आहे आणि आशीर्वाद देत आहे’, असे जाणवले.
उ. श्री मारुतिरायाचे दर्शन घेतांना त्याच्या मुखमंडलावर नम्रता होती. ‘तो नम्रतेने माझ्याकडे पहात आहे’, असे मला वाटत होते.
ऊ. श्री तनोटमातेचे दर्शन घेतांना ‘ती जागृत अवस्थेत असून राष्ट्राच्या रक्षणासाठी कार्य करत आहे आणि तिचे तिसरे नेत्र उघडे असून त्यामधून शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. मला ‘आश्रमामध्ये १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेत आहे’, असे जाणवले.
६. रामनाथी आश्रमातील साधक स्वत:च्या सेवेत व्यस्त असूनही आपुलकीने बोलत होते. मला त्यांच्याकडून प्रेमभाव शिकायला मिळाला.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, आपल्या कृपेमुळेच मला आश्रमामध्ये यायला मिळाले आणि माझ्या साधनेला गती मिळाली. गुरुदेव, तुमच्यामुळेच मला स्थिर राहून साधना आणि सेवा करण्याची पुनश्च संधी मिळाली, यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– अधिवक्ता रूपेश विजय गांगण, लांजा, रत्नागिरी.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |