महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात स्थापन केलेल्या धर्मध्वजाविषयी सौ. रिशिता गडोया यांना आलेल्या अनुभूती !

सौ. रिशिता गडोया

१. केवळ धर्मध्वजाच्या आगमनाच्या विचारानेच संपूर्ण वातावरण चैतन्यमय होणे आणि धर्मध्वजासाठीचा चौथरा सिद्ध करण्याची सेवा झोकून देऊन करणार्‍या श्री. वासुदेव गोरल यांना पाहून ‘गुरुसेवेशी एकरूप कसे व्हायचे ?’ ते शिकायला मिळणे : ‘१४.५.२०२१ या दिवशी पहाटे महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे १३.५.२०२१ या दिवशी त्याची पूर्वसिद्धता चालू होती. त्या वेळी वातावरणात सर्वत्र चैतन्य पसरलेले होते आणि एखादा सण असल्यासारखे वाटत होते. येणार्‍या शुभकाळाची ती नांदी असल्याप्रमाणे भासत होते. ‘त्या धर्मध्वजावर काय असणार आहे ?’, ते आम्हाला ठाऊक नव्हते; पण केवळ धर्मध्वजाच्या आगमनाच्या विचारानेच संपूर्ण वातावरण चैतन्याने भरले होते. साधक श्री. वासुदेव गोरल धर्मध्वजासाठीचा चौथरा सिद्ध करत होते. ते सलग ३ दिवसांपासून ही कठोर शारीरिक श्रमाची सेवा करत होते. रात्रंदिवस ते ही सेवा तितक्याच शांततेने आणि चिकाटीने करत होते. त्या रात्री ९.३० वाजता मी पाहिले, तेव्हा जवळजवळ पूर्ण होत आलेल्या त्या सेवेत परिपूर्णता आणण्याचा ते प्रयत्न करत होते. ‘गुरुसेवेशी एकरूप कसे व्हायचे ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

२. धर्मध्वजाचे दर्शन घेतांना ‘रामराज्याच्या आगमनाला आरंभ झाला असून त्याची घोषणा संपूर्ण जगासाठी करण्यात येत आहे, तसेच धर्मध्वजाकडून चैतन्याच्या मोठ्या लहरी सर्व दिशांना आणि सर्वदूरपर्यंत प्रक्षेपित होत असून वातावरणात श्रीरामतत्त्व वाढले आहे’, असे जाणवणे : १४.५.२०२१ या दिवशी जेव्हा मी धर्मध्वजाचे दर्शन घेतले, तेव्हा माझा भाव जागृत झाला आणि मला पुढीलप्रमाणे जाणवले, ‘धर्मध्वजाची स्थापना झाल्याने रामराज्याच्या आगमनाला आरंभ झाला असून जणू रामराज्याच्या आगमनाविषयी संपूर्ण जगाला घोषित करण्यात येत आहे. मध्यभागी असलेल्या धर्मध्वजाकडून चैतन्याच्या मोठ्या लहरी सर्व दिशांना आणि सर्वदूरपर्यंत प्रक्षेपित होत आहेत. वातावरणात श्रीरामतत्त्व वाढत आहे. माझ्या मनातही श्रीरामाचे विचार येत आहेत.’ ‘धर्मध्वजाचे दर्शन घेता आले’, याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

३. धर्मध्वजाला प्रार्थना करतांना प्रार्थनेनुरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे आणि आशीर्वाद देणार्‍या श्रीरामाचे दर्शन होणे अन् प्रतिदिन धर्मध्वजाचे दर्शन घ्यायला मिळत असल्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटणे : प्रतिदिन सकाळी मला धर्मध्वजाला नमस्कार करण्याची संधी मिळते. डोळे बंद करून नमस्कार करतांना माझ्या मनात काही प्रार्थना येतात. ‘मला आपल्या पावन चरणांशी एकरूप होता येऊ दे’ किंवा ‘मला आपल्या चरणांची सेवा करता येऊ दे’, अशी जेव्हा मी प्रार्थना करते, तेव्हा बर्‍याचदा मला धर्मध्वजावर परम पूज्यांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणांचे दर्शन होते. ‘स्वतःमध्ये रामराज्य स्थापन करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी जेव्हा मी प्रार्थना करते, तेव्हा धर्मध्वजावर मला आशीर्वाद देणार्‍या श्रीरामाचे दर्शन होते. ‘सध्याच्या आपत्कालीन स्थितीत हा धर्मध्वज सकारात्मकता पसरवत आहे’, असे मला जाणवते. प्रतिदिन मला धर्मध्वजाचे दर्शन घ्यायला मिळते, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.’

– सौ. रिशिता गडोया, फोंडा, गोवा. (२६.५.२०२१)