महावितरण कार्यालयाचा वीजदेयकातील भोंगळ कारभार !

श्री. भीमराव खोत यांच्या घरातील मूळ देयक आणि दुरुस्त केलेले वीजदेयक

किर्लोस्करवाडी (जिल्हा सांगली), २ एप्रिल (वार्ता.) – किर्लाेस्करवाडी येथील एक ग्राहक श्री. भीमराव खोत (वय ७० वर्षे) यांना मार्च मासाचे वीजदेयक ३ सहस्र १५० रुपये पाठवण्यात आले होते. प्रत्यक्षात गत ३ मासांचे त्यांचे देयक ७०० रुपयांपेक्षा अधिक नाही. या संदर्भात श्री. खोत यांनी किर्लाेस्करवाडी येथील महावितरणच्या कार्यालयात संपर्क करून त्यांना वीज आकार आणि प्रत्यक्षात असलेले वीजमीटरचे रिडींग यांचे छायाचित्र दाखवले असता संबंधितांनी चूक मान्य करून त्याचा एक अहवाल सिद्ध करून दिला. हा अहवाल श्री. खोत यांना पलूस येथील उपविभाग कार्यालयात सादर करण्यास सांगितले. यानंतर श्री. खोत यांना पलूस येथील कार्यालयात जाऊन ते देयक दुरुस्त करून आणावे लागले. तेथे गेल्यावर त्यांनी ते १ सहस्र ३५० रुपये एवढे करून दिले. प्रत्यक्षात देयक न्यून करण्यासाठी श्री. खोत यांना मानसिक त्रासासमवेत ५ किलोमीटर जाणे-येणे करावे लागले. यावरून प्रत्यक्ष वीजमीटरचे रिडींग न पहाता वीज वितरण आस्थापन कशा प्रकारे भोंगळ कारभार करते, ते लक्षात येते.

संपादकीय भूमिका

ग्राहकाला अधिक रकमेचे देयक पाठवायचे आणि पुन्हा ते दुरुस्त करण्यासाठी ग्राहकालाच हेलपाटे मारायला लावणे हे चीड आणणारे आहे. आस्थापनाच्या या भोंगळ कारभाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे !