अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करतांना झालेल्या दुर्घटनेत ८ जण ठार

भारतियांचाही समावेश

शोधकर्ते पीडितांना शोधताना

न्यूयॉर्क – एका नौकेद्वारे कॅनडातून अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या २ कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये भारतियांचाही समावेश आहे. खराब हवामानामुळे नौका उलटून हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या कुटुंबातील सदस्य सेंट लॉरेन्स नदी पार करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी क्युबेकच्या एका भागात उलटलेल्या नौकेच्या जवळून मृतदेह बाहेर काढले. यांमध्ये २ मुलांचाही समावेश आहे. यांमधील १ कुटुंब हे रोमानियन, तर दुसरे भारतीय वंशाचे होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस प्रमुखांच्या म्हणण्यानुसार सेंट लॉरेन्स नदी अवैधरित्या ओलांडण्याचा प्रयत्न करणार्‍यांची संख्या वाढत आहे. गेल्या ३ मासांत सुमारे ८० लोकांनी या मार्गाने अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. यांतील बहुतांश लोक रोमानियन आणि भारतीय होते.