सिंधुदुर्ग : नरडवे धरण प्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात चालू केल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध

मागण्या पूर्ण केल्यानंतरच काम चालू करण्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी

नरडवे धरण प्रकल्पाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू, प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध; वातावरण तणावपूर्ण
(चित्र सौजन्य : लोकमत)

कणकवली – तालुक्यातील नरडवे धरण प्रकल्पाच्या कामाला ३१ मार्च या दिवशी पोलीस बंदोबस्तात प्रारंभ करण्यात आल्याने संतप्त प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. शेकडो ग्रामस्थांनी ठेकेदार आस्थापनाच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. ‘प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रथम पूर्ण करा आणि त्यानंतरच कामाला प्रारंभ करा’, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

 (सौजन्य : News18 Lokmat) 

पर्यायी शेतभूमीसाठी पैसे भरलेले आणि पर्यायी भूमीची मागणी केलेले, अशा एकूण ३४७ खातेदारांची सूची आहे; मात्र यांपैकी अंतिम सूची २९९ जणांची सिद्ध करण्यात आली आहे. ती पूर्णपणे चुकीची आहे आणि ती आम्हा प्रकल्पग्रस्तांना मान्य नाही. त्यामुळे सर्व ३४७ खातेदारांना स्वतंत्र भूमी अथवा विशेष आर्थिक साहाय्य यांचा लाभ मिळावा. स्वेच्छा पुनर्वसन १५२ खातेदारांनी मागितले असून त्यांना अनुदान कधी देणार, याची हमी द्यावी. पुनर्वसन गावठाणात काही कामांना प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने नागरी सुविधांची ती कामे ठप्प झाली आहेत, यांविषयी प्रकल्पग्रस्तांनी अधिकारी आणि ठेकेदार आस्थापनाचे अधिकारी यांना खडसावले.