भारतीय शास्‍त्रीय नृत्‍य आणि पाश्‍चात्त्य नृत्‍य पहातांना कु. रेणुका कुलकर्णी यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या काही साधिका भारतीय शास्‍त्रीय नृत्‍यप्रकार आणि नृत्‍याच्‍या मुद्रा यांचा सराव करत होत्‍या. मीही त्‍यांचा सराव पहायला गेले होते. तेव्‍हा त्‍या करत असलेल्‍या नृत्‍यमुद्रांतून मला काही अनुभूती आल्‍या आणि त्‍या अनुभूती मुद्रांच्‍या दर्शवलेल्‍या वर्णनानुसार होत्‍या. यात विशेष म्‍हणजे ‘त्‍या मुद्रेला काय म्‍हणतात ?’, हे मला ठाऊक नव्‍हते; परंतु देवाच्‍या कृपेने मला मुद्रांविषयी जे जाणवले, ते मुद्रांच्‍या वर्णनानुसार जुळले. काही दिवसांनी मी ‘यू ट्यूब’वर पाश्‍चात्त्य नृत्‍यप्रकार पाहिले. त्‍या वेळी मला साधिकांचे भारतीय शास्‍त्रीय नृत्‍य आणि ‘यू ट्यूब’वरील पाश्‍चात्त्य नृत्‍य हे दोन्‍ही प्रकार पहातांना काही तौलनिक सूत्रे जाणवली. दोन्‍ही नृत्‍ये पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

१. भारतीय शास्‍त्रीय नृत्‍यातील विविध मुद्रांचे कार्य आणि नृत्‍य यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती !

१ अ. ‘भारतीय शास्‍त्रीय नृत्‍यातील विविध मुद्रांमधून वातावरणात पंचतत्त्वांचे प्रक्षेपण होते’, असे जाणवणे : मुद्रा केल्‍याने वातावरणात पुष्‍कळ शक्‍ती प्रक्षेपित होत होती. प्रत्‍येक मुद्रेतून शक्‍तीचे प्रक्षेपण अधिक प्रमाणात जाणवले. ‘भरतनाट्यम्’ हे शिव आणि शक्‍ती यांचे नृत्‍य आहे. भरतनाट्यम् बघतांना पूर्ण रंगमंचभर शक्‍तीची वलये कार्यरत झाली होती. त्‍या तुलनेत ‘कथ्‍थक’मध्‍ये शक्‍तीपेक्षा ‘भाव’ आणि ‘चैतन्‍य’ अधिक जाणवले. मुद्रा केल्‍यामुळे वातावरणात पंचतत्त्वांचे प्रक्षेपण होत होते. ‘त्‍या त्‍या मुद्रेतून ती ती तत्त्वे प्रक्षेपित होत असावीत. कधी कधी काही मुद्रांमधून दोन किंवा त्‍यांहून अधिक तत्त्वेही प्रक्षेपित होतात’, असे मला जाणवले.

१ आ. ‘मयूर’ हस्‍तमुद्रा पाहिल्‍यावर ‘ती आपतत्त्वाशी संबंधित आहे’, असे जाणवणे आणि ‘या मुद्रेतून वर्षा अन् मयूर यांच्‍याशी संबंधित स्‍पंदनेच बाहेर पडत असावीत’, असे वाटणे : होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी (भरतनाट्यम् विशारद) यांनी मला ‘मयूर’ ही हस्‍तमुद्रा (टीप १) करून दाखवली. मी नृत्‍य शिकले नाही. त्‍यामुळे ‘या मुद्रेला काय म्‍हणतात ?’, याविषयी मला काहीच ठाऊक नव्‍हते. ती मुद्रा बघून ‘ही आपतत्त्वाची मुद्रा आहे’, असे मला जाणवले. त्‍या वेळी ‘पाऊस पडल्‍यावर मोर नृत्‍य करतो, त्‍याप्रमाणे या मुद्रेतून वर्षा आणि मयूर यांच्‍याशी संबंधित स्‍पंदने बाहेर पडत असावीत’, असे मला वाटले.

टीप १ – मयूर हस्‍तमुद्रा : हाताचा अंगठा आणि अनामिका यांची टोके एकमेकांना जोडून ही मुद्रा सिद्ध होते. ही मुद्रा करतांना उर्वरित ३ बोटे सरळ ठेवावीत.

१ इ. एका साधिकेने नृत्‍य करतांना हाताचा पंजा दाखवल्‍यावर ‘तिने हातावर अग्‍नी धरला आहे’, असे जाणवणे आणि प्रत्‍यक्षातही ‘ती हातात अग्‍नी धरल्‍याचीच मुद्रा आहे’, असे समजणे : एकदा कु. अपाला आैंधकर (नृत्‍य अभ्‍यासिका, आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे) हिने नृत्‍य करतांना एकदा हाताचा पंजा दाखवला. तेव्‍हा मला ‘तिने हाताच्‍या पंजावर अग्‍नी धरला आहे’, असे जाणवले. तिच्‍याशी बोलल्‍यावर ‘ती हातात अग्‍नी धरल्‍याचीच मुद्रा आहे’, असे तिच्‍याकडून समजले. मला नृत्‍यातील काही ठाऊक नाही; मात्र तिने सांगितल्‍यावर मला याचा उलगडा झाला.

यांतून ‘भारतीय शास्‍त्रीय नृत्‍यातील प्रत्‍येक मुद्रेला अर्थ आहे. मुद्रांतून शक्‍ती, चैतन्‍य, पंचतत्त्वे इत्‍यादींचे प्रक्षेपण होते’, हे माझ्‍या लक्षात आले.

१ ई. भरतनाट्यम्‌मधील ‘अलारिपू’ या नृत्‍यप्रकाराद्वारे ऊर्ध्‍व दिशेला स्‍थित असलेल्‍या देवतांचे चैतन्‍य नर्तकाच्‍या शरिरात ग्रहण होणे आणि नंतर ते वातावरणात प्रक्षेपित होणे : भरतनाट्यम्‌मधील ‘अलारिपू’ या प्रकारात डोक्‍यापासून पायापर्यंत क्रमाक्रमाने सर्व अवयव हलवत नृत्‍य केले जाते, उदा. प्रथम डोके, नंतर नेत्र, बाहू, पाय इत्‍यादी. ‘अलारिपू’ या तमिळ शब्‍दाचा अर्थ ‘कळी उमलून तिचे फूल होणे’, असा आहे.

‘सहस्रारचक्र’ हेही सहस्र पाकळ्‍यांचे कमळ आहे. त्‍यामुळे ‘अलारिपू केल्‍याने सहस्रारचक्रापासून मूलाधारपर्यंतची सर्व चक्रे जागृत होत असावीत’, असे मला वाटले. ‘अलारिपू’ हे देवतांचे आवाहन आहे. देवता ऊर्ध्‍व दिशेने पृथ्‍वीवर अवतरित होतात. त्‍यामुळे ‘अलारिपूद्वारे ऊर्ध्‍व दिशेला स्‍थित असलेल्‍या देवतांच्‍या चैतन्‍याचे नर्तकाच्‍या डोक्‍यापासून पायापर्यंत शरिरात आगमन होते. येथून त्‍या चैतन्‍याचे वातावरणात प्रक्षेपण होते’, असे मला जाणवले.

२. पाश्‍चात्त्य नृत्‍य आणि भारतीय नृत्‍य पहातांना जाणवलेली सूत्रे

कु. रेणुका कुलकर्णी

एकदा एका बालसाधिकेने तिचा भरतनाट्यमच्‍या वर्गातील अनुभव सांगितला. ती म्‍हणाली, ‘‘भरतनाट्यम् नृत्‍य करतांना छाती आणि पोटाचा भाग ताठ ठेवून हात अन् पाय हलवून नृत्‍य केले जाते. नृत्‍य करतांना शरिराचा मधला भाग (छाती आणि पोट) आणि कंबर हलवत नाहीत.’’ हे ऐकून पुढील सूत्रे माझ्‍या लक्षात आली.

२ अ. ‘बेली डान्‍स’मध्‍ये नर्तकीची कंबर, पोट आणि शरिराचा मधला भाग अधिक प्रमाणात हलवला जाणे अन् त्‍यामुळे अनिष्‍ट शक्‍ती आकृष्‍ट होऊन प्रेक्षकांच्‍या मनोदेहाच्‍या स्‍तरावर वासनेचा संस्‍कार अधिक दृढ होणे : ‘बेली डान्‍स’सारख्‍या अरबी नृत्‍यप्रकारात कंबर, पोट आणि शरिराचा मधला भाग अधिक प्रमाणात हलवला जातो. त्‍यामुळे पुष्‍कळ वासनामय लहरी वातावरणात आणि अनेक अनिष्‍ट शक्‍ती रंगमंचाकडे आकृष्‍ट होतात. ते नृत्‍य बघून मनोदेहाच्‍या स्‍तरावर वासनेचा संस्‍कार अधिक दृढ होतो. प्रेक्षकांच्‍या मनात वासनेचे विचार कित्‍येक दिवस टिकून रहातात. ‘अशा वासनेच्‍या संस्‍कारांमुळे ते अनिष्‍ट शक्‍तींचे मानसिक गुलाम बनतात’, असे मला वाटले.

२ आ. ‘बेली डान्‍स’च्‍या संदर्भात आलेल्‍या त्रासदायक अनुभूती

१. ‘बेली डान्‍स’ हा नृत्‍यप्रकार पहिल्‍या पाताळापासून तिसर्‍या पाताळापर्यंत निगडित आहे’, असे वाटते.’ – कु. रेणुका कुलकर्णी

२. ‘हे नृत्‍य चौथ्‍या पातळातील मोठ्या अनिष्‍ट शक्‍तींशी आणि वासनामय कोशाशी संबंधित आहे’, असे मला जाणवले. ‘बेली डान्‍स’ पहातांना मला मूलाधारचक्रापासून मणिपूरचक्राच्‍या ४ बोटे वरपर्यंत त्रासदायक संवेदना जाणवल्‍या आणि माझे डोके जड झाले.’ – सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, नृत्‍य अभ्‍यासिका

२ इ. ‘बॅले डान्‍स’मध्‍ये घेतल्‍या जाणार्‍या गिरक्‍यांद्वारे पाताळातून येणारी तमोगुणी स्‍पंदने वातावरणात प्रक्षेपित केली जाणे

१. ‘बॅले डान्‍स’ हा नृत्‍यप्रकार पायांच्‍या चवड्यावर, तसेच अधिकतर पायाच्‍या अंगठ्यावर संपूर्ण शरिराचा तोल सांभाळत गिरक्‍या घेत केला जातो.’ – सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर

२. ‘हा नृत्‍यप्रकार बघतांना पुष्‍कळ मोहक वाटतो. ‘यात मायावी स्‍पंदने असून ती प्रेक्षकांना मनोराज्‍यात रमवतात. नर्तकी बराच वेळ पायाच्‍या अंगठ्यांवर चालते. पाताळातून येणारी तमोगुणी स्‍पंदने तिच्‍या अंगठ्यांतून ग्रहण केली जातात. जेव्‍हा नर्तकी गिरक्‍या घेते, तेव्‍हा ती तमोगुणी स्‍पंदने हातांच्‍या माध्‍यमातून गिरक्‍यांद्वारे वलयांच्‍या रूपात वातावरणात फेकली जातात. प्रत्‍येक गिरकीला अनेक वलये निर्माण होतात.‘हे नृत्‍य करून नर्तिकेच्‍या आणि नृत्‍य बघून प्रेक्षकांच्‍या मनोदेहावर दूरगामी परिणाम होतो’, असे मला वाटले.

३. ‘बॅले डान्‍स’ हा नृत्‍यप्रकार चौथ्‍या आणि पाचव्‍या पाताळाशी संबंधित आहे’, असे वाटले. वर पाहिलेला ‘बेली डान्‍स’ हा प्रकार शारीरिक वासनांशी निगडित आहे, तर ‘बॅले डान्‍स’ हा परिकथांमध्‍ये रमवणारा आहे. त्‍यामुळे ‘बेली डान्‍स’ हा तिसर्‍या पाताळाशी निगडित आहे आणि मायावी ‘बॅले डान्‍स’ पाचव्‍या पाताळाशी निगडित आहे’, असे मला वाटले.’

– कु. रेणुका कुलकर्णी

४. ‘बॅले डान्‍स’ हा प्रत्‍यक्ष भावनांशी संबंधित नसला, तरी या नृत्‍यातून मायावी स्‍पंदने जाणवतात. ‘पाचव्‍या पाताळातील मांत्रिक या नृत्‍याच्‍या माध्‍यमातून भावनिक स्‍तरावर त्रासदायक शक्‍तीचे प्रक्षेपण करतात’, असे मला जाणवले.’ – सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर

२ ई. ‘भरतनाट्यम्’ पहातांना नर्तिकेचा चेहरा, तिचे हावभाव आणि मुख्‍यतः तिचे पाय यांच्‍याकडे लक्ष जाणे अन् प्रेक्षकांना नकळतपणे देवतातत्त्वाची अनुभूती येणे : अनेक पाश्‍चात्त्य नृत्‍यप्रकारांत कंबर आणि नितंब अधिक प्रमाणात हलवले जातात. त्‍यामुळे प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष नर्तिकेची कंबर, नितंब आणि स्‍तन इत्‍यादी भागांकडे जाते; याउलट भारतीय नृत्‍यप्रकारांत दर्शकांचे लक्ष नर्तिकेचा चेहरा, तिचे हावभाव, हात, मुद्रा आणि मुख्‍यतः तिचे पाय यांच्‍याकडे जाते. त्‍यामुळे त्‍या नृत्‍यातून वातावरणात आनंदलहरी प्रक्षेपित होतात आणि प्रेक्षकांना नकळतपणे देवतातत्त्वाची अनुभूती येते.

२ उ. पाश्‍चात्त्य नृत्‍य आणि भारतीय शास्‍त्रीय नृत्‍य यांतील भेद : ‘बेली डान्‍स’सारख्‍या नृत्‍यामुळे मणिपूर आणि अनाहत या चक्रांच्‍या ठिकाणी सूक्ष्मातून मोठे काळे भोवरे कार्यान्‍वित होतात, तसेच छाती आणि पोट यांच्‍यामधील पोकळीत काळ्‍या शक्‍तींचे ढग निर्माण होतात. ‘तेथे काळी शक्‍ती साठवली जातेे’, असे मला जाणवले; याउलट आध्‍यात्मिक स्‍तरावरील, तसेच भारतीय शास्‍त्रीय नृत्‍यप्रकार केल्‍याने कुंडलिनीशक्‍ती जागृत होतेे. भारतीय नृत्‍यप्रकारांमुळे वर सांगितल्‍याप्रमाणे विविध चक्रे कार्यान्‍वित होऊन त्‍यांची शुद्धी होते. ‘भारतीय नृत्‍यप्रकार सात्त्विक असल्‍याने त्‍यातून आध्‍यात्मिक आणि दैवी आनंद मिळतो’, असे मला जाणवले.

या अर्थाने ‘सा विद्या या विमुक्‍तये ।’, ही उक्‍ती सार्थ ठरते. पाश्‍चात्त्य कलांचा उद्देश ‘मनोरंजन करणे’, हा असल्‍याने त्‍या कला जिवाला वासना आणि लोकेषणा यांच्‍या बंधनात अडकवतात, तर भारतीय कला जिवाला खर्‍या अर्थाने मुक्‍त करतात.

३. आध्‍यात्मिक स्‍तरावरील नृत्‍य पहातांना  प्रेक्षकाला सूक्ष्मातून अनुभूती घेता येणे

आध्‍यात्मिक स्‍तरावर नृत्‍य झाले, तर दैवी पंचतत्त्वे सूक्ष्मातून प्रगटतात. तेव्‍हा कृत्रिम पार्श्‍वसंगीताची आवश्‍यकता कदाचित् भासणार नाही. सूक्ष्मातील जाणणार्‍याला प्रसंगानुसार त्‍या त्‍या तत्त्वाची अनुभूती येऊन खर्‍या अर्थाने रसग्रहण करता येईल, उदा. रामसेतूबंधन या प्रसंगाच्‍या संदर्भात नृत्‍य अथवा नाट्य दाखवायचे असेल, तर ‘सागर’ दाखवतांना रंगमंचावर सूक्ष्मातून आपतत्त्व प्रगटेल आणि सूक्ष्मातील जाणणार्‍याला त्‍याची अनुभूती येईल, उदा. थंडावा जाणवणे. कलाकाराची आध्‍यात्मिक पातळी चांगली असेल आणि त्‍याची ईश्‍वरप्राप्‍तीची तळमळही अधिक असेल, तर खरे नृत्‍य हे सूक्ष्म स्‍तरावरही कार्य करेल. तेव्‍हा ‘सूक्ष्मातून वर्षा होत आहे, सुगंध येत आहे’, अशा अनुभूती येतील.’

– कु. रेणुका कुलकर्णी (संगीत अभ्‍यासिका), महर्षि अध्‍यात्‍म विश्वविद्यालय, गोवा. (२३.९.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.