शेतकर्‍यांच्या समृद्धीचे जलयुक्त शिवार – २ !

रत्नागिरी – शेतकर्‍यांनी शेतीसाठी स्वत:चे हक्काचे पाणी मिळवावे, या उद्देशाने चालू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार कार्यक्रमाचा दुसरा टप्पा राज्यात राबवण्याचा निर्णय झाला आणि याविषयीचा कामाला प्रारंभही झाला आहे.

राज्यात अनेक भागांत नद्यांमध्ये पाणी उपलब्ध असले, तरी ते धरणे आणि पाट बांधून पोहचवण्यात बरीच आव्हाने आहेत. यात या मोठ्या प्रकल्पांचा खर्च, तसेच भूसंपादन करावे लागते आणि असे प्रकल्प उभे करण्यासही वेळही अधिक लागतो. यासाठी नवी सिंचनव्यवस्था म्हणून जलयुक्तचा विचार समोर आला. याची प्रभावीपणे कार्यवाही झाल्याने राज्यात सहस्रो हेक्टर शेती सिंचनासाठी आणणे शक्य झाले आहे.
‘आपल्याच शेतात काही भाग शेततळ्यासाठी ठेवून त्या शेततळ्यात जमलेल्या पाण्यावर सिंचन करणे’, असे याचे स्वरूप आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत केवळ एक हंगामी शेतीची पद्धत होती. पावसाळ्यानंतर सिंचनव्यवस्था नसल्याने हा प्रकार दिसून येत होता; मात्र जलयुक्त शिवार अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाले. ज्यामुळे शेतकर्‍यांना खरिपासमवेतच रब्बीच्या हंगामातही शेती करणे शक्य झाले, तर अनेक जिल्ह्यांत उन्हाळी हंगामात शेती झाल्याने ३ हंगामी शेतीमुळे शेतकर्‍यांची संपन्नता वाढीस लागली.

रत्नागिरी जिल्ह्यात आता दुसर्‍या टप्प्यात जलयुक्त शिवार अंतर्गत २४३ गावांत जलयुक्त शिवार अंतर्गत कामे घेण्यास जिल्हा समितीने मान्यता दिली आहे. दुसरा टप्पा राबवतांना याचे निकष काही प्रमाणात पालटून यात लोकसहभागासमवेतच निमसरकारी आणि खासगी संस्था यांनाही सामिल करून घेण्यात येत आहे.

शासनाच्या निकषांप्रमाणे गावाचा आराखडा सिद्ध करणे आणि त्यासमवेतच शिवारफेरीद्वारे याचा प्रचार करणे, आदी कामे करण्यात येणार आहेत. पूर्वीच्या टप्प्यात जी गावे यात सामिल होती, ती वगळण्यात येणार आहेत.

पाणलोट क्षेत्र निहाय गावाचा आराखडा करून त्यात प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल आणि त्यानुसार ही कामे केली जातात. सिंचन क्षमतेअभावी आणि अल्प अधिक पावसामुळे तोट्यात जाणारी शेती या उपायाने लाभात येणार. शेतकर्‍यांना स्थैर्य आणि संपन्नता दोन्हीचा लाभ देणारा ही जलयुक्त शिवार अभियानाची आगामी काळातील ओळख रहाणार आहे. शेतकर्‍यांच्या समृद्धीसाठी शासनाची कटीबद्धता यामुळे अधोरेखीत होईल, हे निश्चित !

(प्रशांत दैठणकर, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी)