शेवटच्‍या क्षणापर्यंत श्रीरामांच्‍या समवेत सावलीसारखा राहून ‘रामसेवा’ हाच संसार करणारा लक्ष्मण !

आज ३०.३.२०२३ या दिवशी श्रीरामनवमी आहे. त्‍या निमित्ताने…

‘अनेक मंदिरांत या दिवशी सोन्‍याचा पाळणा सजवलेला असतो. अलंकार घातलेले असतात. मोत्‍यांचे छत असते. प्रसाद, तीर्थ, हार आणि गुच्‍छ असतात. भिंती चहूबाजूंनी सजवलेल्‍या असतात. तेथे उत्‍साह असतो; पण त्‍यात नसतो केवळ राम ! राम निर्माण करणे, ही गोष्‍ट सोपी नाही. राम हा मनात निर्माण व्‍हावा लागतो. ज्‍या वेळी तुम्‍ही जाणीवपूर्वक ज्ञान घेऊन अज्ञान दूर कराल, तेव्‍हा आयुष्‍यात परिपूर्ण व्‍हाल. मग ज्‍यांची प्रतिमा जाणीवपूर्वक पुढे ठेवून अज्ञान घालवायचे, अशी एकच अप्रतिम प्रतिमा, म्‍हणजे प्रभु श्रीरामाची !

१. लक्ष्मणाच्‍या माध्‍यमातून रामाची ओळख करून घेणे

१ अ. रामाला पहाण्‍याचे भिंग म्‍हणजे लक्ष्मण ! : राम हा सूर्य आहे. सूर्याकडे म्‍हणजे तेजाकडे पहाणे सोपे नाही; म्‍हणून एकदम रामाच्‍या तेजाला सामोरे न जाता लक्ष्मणाच्‍या ओळखीने प्रभु श्रीरामाची ओळख करून देणार आहे. ‘लक्ष्मणाला जाणले, तरी तुम्‍ही श्रीरामाला पुष्‍कळच जाणले’, असे आहे. जी वस्‍तू पहायची तिला एक भिंग लागते. हे भिंग म्‍हणजे लक्ष्मण आहे. तो तुम्‍हाला राम मोठा किंवा विराट करून दाखवील. लक्ष्मणाची निष्‍ठा आयुष्‍यभर रामाच्‍या ठायी होती.

१ आ. राम आणि लक्ष्मण यांचे एकमेकांवरील विलक्षण प्रेम : राम आणि लक्ष्मण हे सावत्र भाऊ होते अन् शत्रुघ्‍न आणि लक्ष्मण हे सख्‍खे भाऊ होते. लक्ष्मण हा एक मानदंड होता. ‘वाल्‍मीकि रामायणा’त उर्मिलेचा पती म्‍हणून त्‍याचा उल्लेख ५ हून अधिक वेळा आढळेल; पण त्‍याने संसार कुठे केला ? ‘रामसेवा’ हा एकच त्‍याचा संसार होता. लक्ष्मण हा सावलीसारखा शेवटपर्यंत रामासह राहिला. सावली ही त्‍या व्‍यक्‍तीशी अतिशय एकनिष्‍ठ रहाते. जी सतत तुम्‍हाला साथ देते ती सावली. लक्ष्मण बालपणी रामाच्‍या कुशीत झोपत असे आणि रामाला एखादा गोड पदार्थ मिळाला, तर त्‍याने तो लक्ष्मणाला दिल्‍याविना स्‍वतः एकट्याने कधीही खाल्ला नाही. रामाला राज्‍याभिषेक करण्‍याचे ठरवले, त्‍या वेळी रामाने ही वार्ता प्रथम आईला सांगितली आणि नंतर लगेच लक्ष्मणाला सांगितली. तो लक्ष्मणाला म्‍हणाला, ‘‘अरे, राज्‍य माझे नाही, तुझे आणि तुझेच आहे रे !’’ असे इतके प्रेम रामाने लक्ष्मणावर केले.

२. राम, लक्ष्मण आणि सीता यांचे वनवासाला जाणे

२ अ. कैकयीने वर मागण्‍यात चूक नसल्‍याचे रामाने लक्ष्मणाला सांगणे : रामायणात लक्ष्मणाचे प्रेमसुद्धा गंमतीदार पद्धतीने दिले आहे. ज्‍या वेळी ‘रामाला राज्‍याभिषेक करायचा नाही’, असे ठरले, तेव्‍हा राम मुळीच रागावला नाही. लक्ष्मण मात्र चिडला. लक्ष्मणाने सांगितले, ‘‘रामा, तू राजसत्ता हातात घे. मी धनुष्‍य घेऊन बाहेर उभा रहातो.’’ तरीसुद्धा राम शांत होता. तो लक्ष्मणाला म्‍हणाला, ‘‘तू का रागावत आहेस ? कैकयीने वरदान का मागितले ? तर तिने साहाय्‍य केले होते. ‘पत्नीचेही साहाय्‍य फुकट घेऊ नये’, असा आमचा कर्मसिद्धांत आहे ना ? तिने स्‍वतःच्‍या पुरुषार्थाने वर मिळवला आणि तो वर तिने राखून ठेवला. यात तिची काय चूक आहे ? नंतर ‘आपल्‍या मुलाला राज्‍य मिळावे’, असे तिला वाटण्‍यात तिची चूक काय आहे ? तिने तो वर मागितला आणि पूर्वी वचन दिले असल्‍यामुळे दशरथाने तो दिला. एकदा वचन दिल्‍यानंतर ते भंग करून आयुष्‍य मातीला मिळते. दशरथाने दिलेले वचन पाळणे क्रमप्राप्‍तच आहे. त्‍यांनी मला सांगितले, ‘जा.’ मी जात आहे. कैकयी माझीच आई आहे. ती सावत्र आहे, हे मी जाणत नाही. तेव्‍हा कुणाचेच काही चुकलेलेे नाही. तू रागावतो आहेस ते चुकत आहे.’’ लक्ष्मण गप्‍प बसला आणि म्‍हणाला, ‘‘ठीक आहे. असे आहे, तर मीही तुमच्‍यासह वनवासात येतो.’’ मग ते वनवासाला निघाले.

२ आ. राम आणि सीता झोपलेे असतांना लक्ष्मणाने रात्रभर पहारा करणे : त्‍यांनी श्रृंगवेरपूरला पहिला मुक्‍काम केला. तेथे निषादपती (कोळी जातीतील व्‍यक्‍तींचा प्रमुख) गुह म्‍हणून होता. राम आणि सीता उघड्यावर झोपलेे होते. गुह म्‍हणाला, ‘‘लक्ष्मणा, तूसुद्धा झोप. मी आणि माझे निषाद आहेत, आम्‍ही रात्रभर पहारा करतो.’’ तेव्‍हा लक्ष्मणाने एकदाच त्‍या गुहाच्‍या डोळ्‍यांकडे रोखून पाहिले आणि त्‍याला विचारले, ‘‘गुहा, तू काय बोलतो आहे ? राम आणि सीता माझी दैवते आहेत. ती बाहेर उघड्यावर झोपलेली आहेत आणि मला झोप येईल का ? तू किंवा कुणीही असले, तरी मला येथे थांबलेच पाहिजे. मला जागलेच पाहिजे.’’ असे सांगून लक्ष्मण जागाच राहिला.

३. भरताला प्रचंड सैन्‍य घेऊन येतांना पाहिल्‍यावर रामाने व्‍यक्‍त केलेले बंधुप्रेम

पुढे नंतर भरत प्रचंड सैन्‍य घेऊन येत होता. ते पाहिल्‍यावर लक्ष्मणाला शंका आली, ‘‘भरत एवढे सैन्‍य कशासाठी आणत आहे ? हा रामावर स्‍वारी करण्‍यासाठी आलेला असावा. मग भरताला ठार मारलेच पाहिजे.’’  राम म्‍हणाला, ‘‘भरताला मारून मला राज्‍य करायचे नाही. तुला तर ठाऊक आहे की, मला राज्‍य मिळाल्‍याचे समजल्‍यावर मी तुला सांगितले होते, ‘ राज्‍य माझे नाही. तुझे आहे. मला राज्‍य करायचेच असते, तर ते माझ्‍या भावांसाठी आणि जनतेसाठी करायचे आहे.’ रामराज्‍यातील हे आदर्श भाऊ होते, ते भावासाठी म्‍हणून काम करत होते. या  प्रसंगात लक्ष्मण रामाशी किती एकनिष्‍ठ होता, हा महत्त्वाचा बोध आहे.

४. राम आणि लक्ष्मण यांचे मतभेद होऊनही ते मनाने पूर्ण एकरूप रहाणे

लक्ष्मणाचे ध्‍येय साधे होते. रामाने जे ठरवलेे आहे त्‍याला साथ द्यायची. सीतेच्‍या अग्‍निपरीक्षेच्‍या वेळी त्‍याचा रामाशी मतभेद झाला. सीता अधिक पवित्र असल्‍याने अग्‍निदिव्‍याच्‍या वेळी लक्ष्मण रामावर संतापलेला होता. अनेक वेळा रामाशी त्‍याचे मतभेद झाले; पण कधी मनभेद झाला नाही. केवढा थोर होता लक्ष्मण !

५. लिप्‍त असूनही अलिप्‍त असलेला लक्ष्मण !

लक्ष्मणासारखा दिव्‍य भाऊ रामाला मिळाला, हेच रामाचे एक मोठेपण. रामाची आवड, त्‍याचे कर्तव्‍य आणि जीवित हेतू यांना जराही धक्‍का पोचला की, तो खवळून उठायचा. लक्ष्मणात एक लिप्‍त अलिप्‍तता होती, म्‍हणजे तो सीता आणि राम यांना लिप्‍त होता; पण तेवढाच अलिप्‍तही होता. हे त्‍याचे वैशिष्‍ट्य होते.

५ अ. सीतेने लक्ष्मणाला रामाच्‍या साहाय्‍यासाठी जाण्‍यास सांगणे आणि त्‍याच्‍यावर दोषारोप करणे : रावणाने सीतेला पळवल्‍याचा प्रसंग होता. सुवर्णमृग पळून जाऊ लागला, तेव्‍हा सीतेच्‍या हट्टामुळे राम त्‍याच्‍या मागे लागला आणि सीतेने किंकाळी ऐकली, ‘धाव लक्ष्मणा, धाव सीते.’ त्‍या वेळी सीता लक्ष्मणाला सांगू लागली, ‘‘राम संकटात आहे, तू जा.’’ तेव्‍हा तो एवढेच म्‍हणाला, ‘‘राम संकटात आहे ? राम संकटात कसा असेल ? त्‍याला पाहून दुसरे घाबरतील. तू हे बरोबर बोलत नाहीस.’’ लक्ष्मणाने परोपरीने समजावून सांगितले की, हे काहीतरी मायावी आहे. सत्‍य नाही. आता सीतेने एवढे तरी सांगावे की, राम संकटात नसेल, तरी आपण दोघेही बरोबर जाऊया. तशी तिला बुद्धीच झाली नाही. लक्ष्मणाने शेवटी सांगितले, ‘‘नाही. काहीतरी कावा (गडबड) आहे.’’ त्‍यावर सीता म्‍हणाली, ‘‘इतके होऊनही तू जात नाहीस, तर तुझ्‍या मनात विकार निर्माण झालेला आहे.’’

५ आ. लक्ष्मणाने सीतेच्‍या रक्षणासाठी रेषा काढणे : लक्ष्मणाने हे ऐकून डोक्‍याला हात लावला. डोळ्‍यांत पाण्‍याच्‍या धारा होत्‍या. तो लिप्‍त अणि अलिप्‍तही होता की, आता सीतेचे काय होईल ? आता मी काय करू ? त्‍याने तिला शेवटची रेषा काढून दिली.

५ इ. सीतेने लक्ष्मणावर केलेल्‍या दोषारोपामुळे त्‍याचे प्रायश्‍चित्त भोगावे लागणे : सीतेने केलेला आरोप खरा नव्‍हता, हे तिलाही ठाऊक होते. पुढे सीता अशोक वनात असतांना हनुमानाला म्‍हणाली, ‘‘त्‍या वेळी मी लक्ष्मणाला चुकीची दुषणे दिली, संशय घेतला; म्‍हणून मला हे संकट आले. चुकीच्‍या विधानाचे प्रायश्‍चित्त जे असेल, ते भोगावेच लागेल. स्‍वतःचे अज्ञान हेच आपल्‍याला त्‍या वेळी ज्ञान वाटत असते. आता काही उपयोग नाही.’’

५ ई. लक्ष्मणाने सीतेच्‍या दागिन्‍यांपैकी केवळ पायांतील तोरड्याच (चांदीचे पैंजण) ओळखणे : सुग्रीवाला दागिन्‍यांची पुरचुंडी सापडली. तेव्‍हा ‘सीता कुठल्‍या वाटेने गेली असेल ? हे सीतेचेच दागिने आहेत का ? असले, तर तिला या मार्गाने पळवणारा घेऊन गेला असावा’, इत्‍यादी गोष्‍टी पडताळून पहायच्‍या होत्‍या. त्‍यासाठी सुग्रीव ‘हे सीतेचे दागिने आहेत का ?’, हे विचारण्‍यास रामाकडे गेला. त्‍या वेळी राम लक्ष्मणाला म्‍हणाला, ‘‘यात सीतेचे दागिने आहेत, असे तुला वाटते का ?’’ त्‍यावर लक्ष्मण म्‍हणाला, ‘‘मी यातील केवळ तोरड्याच ओळखतो; कारण मी केवळ तिच्‍या पायांकडेच पहात होतो. मला अन्‍य काही ठाऊक नाही.’’ यातून त्‍याच्‍या विचारांची उंची दिसून येते.

६. लक्ष्मणाला रामापासून दूर केल्‍यावर त्‍याचा अंत होणे

लक्ष्मणाचा प्राण कसा गेला ?  ब्रह्मदेवाने काळाला सांगितले, ‘‘तू जाऊन ये.’’ काळ रामाला निरोप द्यायला गेला, ‘‘तुझा काळ संपलेला आहे; म्‍हणून आता तुझी जायची वेळ आली.’’ सगळे निरोप देऊन ते चर्चा करायला बसलेले असतांना लक्ष्मणाला बाहेर पहार्‍यावर बसवले होते आणि ‘आत कुणालाही सोडायचे नाही’, असे सांगितले होते. ‘जो आतमध्‍ये येईल, त्‍याला रामाने देहदंडाची शिक्षा दिली पाहिजे’, अशा अटीवरच काळ तेथे बसला होता. तिकडून दुर्वासऋषी आले. आयुष्‍यात परीक्षेच्‍या सर्व वेळा एकत्रच येतात पहा. दुर्वास आले आणि म्‍हणाले, ‘‘मला आत सोड.’’ लक्ष्मण म्‍हणाला, ‘‘आत सोडायचा हुकूम नाही.’’ दुर्वास म्‍हणाले, ‘‘रघुवंशाचा नाश करीन. तू काय समजलास ?’’ लक्ष्मण म्‍हणाला, ‘‘सगळ्‍या रघुवंशाचा नाश होण्‍यापेक्षा माझा एकट्याचा नाश झालेला बरा.’’ तो मुकाट्याने आत गेला. काळाची भेट आटोपली आणि लक्ष्मण रामापुढे जाऊन उभा राहिला अन् म्‍हणाला, ‘‘तुम्‍ही मला सांगितले होते की, अमूक अमूक झाले, तर देहदंड घ्‍यावा लागेल. आता मला फाशी द्या.’’

‘लक्ष्मणाला फाशी द्या’, असे म्‍हणत म्‍हणत रामाला काय करावे कळेना ! तेवढ्यात आलेले वसिष्‍ठऋषि रामाला म्‍हणाले, ‘‘तू असे कर, प्रत्‍यक्ष त्‍याला फाशी द्यायची आवश्‍यकता नाही. त्‍याला तुझ्‍या हद्दीबाहेर काढ, म्‍हणजे झाले. तो मेल्‍यासारखाच आहे. लक्ष्मण तुला सोडून राहू शकत नाही, हे तुला ठाऊक आहे.’’ ‘तीच अट, लक्ष्मणाला रामापासून दूर करायचे; पण प्रत्‍यक्ष मारायचे मात्र नाही’, हेच वसिष्‍ठांनी रामाला निराळ्‍या शब्‍दात सांगितले. राम आणि लक्ष्मण या दोघांनाही पटले. वसिष्‍ठांचा अनुभव होता की, लक्ष्मण रामाविना राहू शकणार नाही. तो रामाचा श्‍वास होता.’

संक्षिप्‍त संकलन – गीतेश (स्‍वामी विज्ञानानंद यांनी रामनवमीनिमित्त सांगितलेले विचार)

(साभार : मासिक ‘मनशक्‍ती’)