एकाच ठिकाणी बराच काळ कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचे स्थानांतर होणार !
सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे येणार्या पर्यटकांना यापुढे वाहतूक पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही. कुणी पोलीस किंवा वाहतूक पोलीस कर्मचारी त्यांना त्रास देत असल्याची माहिती मिळाल्यास सहन केले जाणार नाही. कर्मचारी बराच काळ एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्यामुळे अवैध व्यवसायांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अशा कर्मचार्यांचे लवकरच स्थानांतर केले जाणार आहे, असे कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी २७ मार्च या दिवशी येथे सांगितले.
महानिरीक्षक पवार जिल्हा दौर्यावर आले आहेत. या अंतर्गत वार्षिक तपासणीसाठी त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याला भेट दिली. या वेळी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके, सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात येणार्या पर्यटकांना पोलिसांचा त्रास झाल्यास तशी तक्रार उत्तरदायी अधिकार्यांकडे करावी. वाहनांना ‘फॅन्सी नंबर प्लेट’ आणि काचांना ‘ब्लॅक फिल्म’ लावणार्या गाड्यांवरसुद्धा कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय अल्प आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे. याचे सर्व श्रेय जिल्ह्यातील नागरिकांना आहे; मात्र बाहेरील लोक येऊन या ठिकाणी गुन्हे करतात. हे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. पोलीस कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील पोलीस ठाण्यांच्या वसाहती सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.’’