सामाजिक माध्यमांमुळे मनोविकार वाढतात, मनुष्य संकुचित आणि आत्मकेंद्रित होत चालला आहे, अशा प्रकारचे विचार मांडले जात असतांना अमेरिकेतील ‘सॅन मॅटो काऊंटी बोर्ड ऑफ एज्युकेशन’ या शैक्षणिक संस्थेकडून न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, गूगल, टिकटॉक, स्नॅपचॅट या सामाजिक माध्यमांना मनोविकार वाढवण्यासाठी उत्तरदायी असल्याचे म्हटले आहे. या संस्थेचे म्हणणे आहे की, या माध्यमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मनोविकार निर्माण होत आहेत. यावर फेसबुकचे निर्मिती आस्थापन मेटाने म्हटले की, ते मुलांना यापासून रोखण्यासाठी त्यांच्या खात्यावर नियंत्रण ठेवत आहेत.
ही याचिका विद्यार्थ्यांच्या संदर्भात असली, तरी सामाजिक माध्यमांचा प्रभाव संपूर्ण जगातील नागरिकांवर पडलेला आहे. या माध्यमांद्वारे मनुष्य जगाच्या कुठल्याही टोकाला असणार्या व्यक्तीशी काही क्षणांत संपर्क साधून देवाणघेवाण करू शकतो. विज्ञानाने जगाला हाताच्या बोटांवर आणले असले, तरी त्याचा परिणाम मनावर होत आहे, हे यातून लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आज जगातील ९० टक्के लोक भ्रमणभाष, भ्रमणसंगणक किंवा संगणक यांद्वारे सामाजिक माध्यमांशी जोडलेले दिसून येत असतात. आताची पिढी रात्री झोपतांना हे पहात झोपते. त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांसह संपूर्ण शरिरावर आणि नंतर मनावर होत आहे. हे वेळोवेळी तज्ञांकडून सांगितले जात आहे. यावर अद्यापतरी कोणत्या देशाने नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलेला नाही; कारण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात सरकार किंवा प्रशासन हस्तक्षेप करू शकत नाही. हे योग्य आहे; पण याविषयी आज समाजामध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक माध्यमे आज जगाची मूलभूत गोष्ट झालेली आहे. त्यांना रोखता येणार नाही; मात्र त्या संदर्भात आपण आपल्यावर किती नियंत्रण ठेवू शकतो ? जेणेकरून त्यामुळे आपले शरीर, मन आणि बुद्धी यांवर परिणाम होणार नाही, हे प्रत्येक जण नक्कीच ठरवू शकतो. अमेरिकेतील न्यायालय यावर काय निर्णय देते, हे पुढे कळेल; मात्र समाजाने याचा स्वतःच्या स्तरावर विचार करण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्यावेच लागेल !