गोव्यात सरकारी नोकरीसाठी खासगी नोकरीचा किमान १ वर्षाचा अनुभव बंधनकारक

मार्च २०२४ पर्यंत २ सहस्र ५७२ रिक्त शासकीय पदे भरण्याचे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २७ मार्च (वार्ता.) – सरकारी नोकरीसाठी अर्ज करतांना खासगी नोकरीचा किमान १ वर्षाचा अनुभव असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे सरकारी नोकरी अनुभवाविना थेट दिली जाणार नाही, अशी माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे आमदार वीरेश बोरकर यांनी विचारलेल्या एका अतारांकित प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

 

त्यांनी पुढे म्हटले आहे की, मार्च २०२४ पर्यंत सरकारच्या विविध खात्यांमधील २ सहस्र ५७२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. निवृत्तीनंतर रिक्त झालेली सरकारी पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. राज्यात आता कायमस्वरूपी २० सहस्र ५४६, तर हंगामी तत्त्वावर १ सहस्र ९९५ सरकारी कर्मचारी आहेत.

यापूर्वी पदवी घेण्यापूर्वीच सरकारी नोकरीसाठी किंवा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज केलेले आहेत; परंतु यापुढे असे घडणार नाही.

काँग्रेसचे नेते काळे कपडे परिधान करून विधानसभेत

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रहित केल्याचे पडसाद २७ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले.

केंद्राच्या कृतीचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा आणि आमदार कार्लुस फरेरा यांनी काळे कपडे परिधान केले होते.