चीनकडून उघूर मुसलमानांवर रमझानचा उपवास ठेवण्यावरून बंदी !

मुसलमानांवर मद्यपान आणि डुकराचे मांस खाण्यासाठीही दबाव !

वॉशिंग्टन (अमेरिका) – सध्या चालू असलेल्या मुसलमानांच्या रमझान मासात उपवास ठेवण्यावरून चीनच्या साम्यवादी सरकारने प्रतिबंध लादला आहे. तसेच कुणी अशा प्रकारे उपवास ठेवते का, यावर लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती ‘रेडिओ फ्री एशिया’ या संघटनेने दिलेल्या अहवालातून समोर आली आहे. चीन मुसलमानांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांवर सातत्याने आक्रमण करत असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.

या अहवालानुसार ‘विश्‍व उघूर कांग्रेस’चे प्रवक्ते दिलशात ऋषित यांनी म्हटले की, रमझानच्या काळात चीनच्या उघूर मुसलमानबहुल शिनझियांग प्रांतातील १ सहस्र ८११ गावांमध्ये २४ घंटे पहारा ठेवण्यात येत आहे. तसेच साम्यवादी सरकारकडून येथील मुसलमानांना मद्यपान आणि डुकराचे मांस खाण्यासाठीही दबाव आणण्यात येत आहे. या अहवालानुसार शिनझियांग प्रांतात किमान १८ लाख उघूर मुसलमानांना कैद करण्यात आले असून त्यांच्याकडून कष्टाची कामे करवून घेतली जात आहेत. तसेच उघूर समाजाच्या महिलांवर बलात्कार, लैंगिक शोषण यांसारखे अत्याचार केले जात आहेत.

संपादकीय भूमिका 

एरव्ही भारतावर ‘मुसलमानद्वेषा’चा आरोप करणारी पाकिस्तान आणि तुर्किये देशांची सरकारे चीनच्या मुसलमानविरोधी धोरणाविषयी एक शब्दही काढत नाहीत. पाकिस्तानचा मुसलमान प्रेमाविषयीचा हा दुटप्पीपणा जाणा !