(म्हणे) ‘मी गप्प बसणार नाही, मी मोदी यांना घाबरत नाही !’ – राहुल गांधी

पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी

नवी देहली – देशात आज लोकशाहीवर आक्रमण होत आहे. याची उदाहरणे प्रतिदिन पहायला मिळत आहेत. मी संसंदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांच्या संबंधावर प्रश्‍न विचारले होते. त्याचे पुरावेदेखील सादर केले होते. ‘अदानी यांच्या आस्थापनांमध्ये २० सहस्र कोटी रुपये कुणी गुंतवले ?’ असा थेट प्रश्‍न मी विचारला होता. त्यामुळे माझी खासदारकी रहित करण्यात आली, असा फुकाचा आरोप राहुल गांधी यांनी येथील काँग्रेस कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला. ‘माझी खासदारकी रहित झाली, तरी मी गप्प बसणार नाही. मी मोदी सरकारला प्रश्‍न विचारणे बंद करणार नाही. मी त्यांना घाबरत नाही’, असेही राहुल गांधी म्हणाले. सुरत सत्र न्यायालयाने मोदी आडनावाविषयी मानहानी केल्यावरून राहुल गांधी यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रहित करण्यात आली. या प्रकरणी गांधी यांनी स्वतःची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. मोदी समाज ओबीसी वर्गात मोडत असल्याने भाजपने या प्रकरणी राहुल गांधी यांनी मोदी समाजाचा अवमान केल्याचाही आरोप केला आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मुळात हा ओबीसीचा विषयच नाही. हा मोदी आणि अदानी यांच्या संबंधाचा विषय आहे. ओबीसींना पुढे करत भाजप सूत्र भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे; पण त्यांनी कितीही आरोप केले, तरी मी त्यांना प्रश्‍न विचारणे बंद करणार नाही, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

भारतात लोकशाही असल्याने प्रत्येकाला बोलण्याचे, मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे; मात्र या स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाची मानहानी करण्याची अनुमती राज्यघटनेने कुणालाही दिलेली नाही, हे राहुल गांधी विसरलेले आहेत, ते ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ या आविर्भावात बोलत आहेत, हेच लक्षात येते !

(म्हणे) ‘मी सावरकर नाही, गांधी आहे; क्षमा मागणार नाही !’ – राहुल गांधी यांचा पुनरूच्चार !

पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने ‘भाजपने म्हटले की, ‘तुम्ही क्षमा मागितली असती, तर ही स्थिती आली नसती. याविषयी तुम्हाला काय वाटते ?’ असा प्रश्‍न राहुल गांधी यांना मानहानीविषयी विचारला. त्यावर राहुल गांधी यांनी उत्तर देतांना, ‘मी सावरकर नाही. गांधी आहे. क्षमा मागणार नाही’, असा पुनरुच्चार केला. यापूर्वी काँग्रेसकडून एक चित्र ट्वीट केले होते. त्यात राहुल गांधी यांना दाखूवन वरील विधान केले होते.

संपादकीय भूमिका

राहुल गांधी ढोंगी आहेत. यापूर्वी त्यांनी २ वेळा न्यायालयात क्षमा मागितली होती. त्यामुळे त्यांना शिक्षा झाली नव्हती. या जाहीर घटना आहेत; मात्र राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापेक्षा स्वतःला मोठे ठरवण्यासाठी उघड उघड खोटे बोलत आहेत, हे लक्षात घ्या ! अशांची कधीतरी सावकरांशी तुलना होऊ शकते का ?