एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका !
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !
राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.
भुसावळ, २२ मार्च (वार्ता.) – भुसावळ बसस्थानक केवळ बसगाड्यांचे नव्हे, तर भटक्या कुत्र्यांचेही निवासस्थान झाले आहे. बसस्थानकाच्या आवारात दिवसभर भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. बसस्थानकाच्या परिसरासह तेथील बाकड्यांवरही भटकी कुत्री बसत असल्याने प्रवाशांची असुविधा होत आहे.
बसस्थानकाच्या परिसरात भटकणारे कुत्रे, गंजलेल्या आणि मोडकळीस आलेल्या बसगाड्या, धुळीचे साम्राज्य, बंद स्थितीत अन् भग्नावस्थेत असलेले उपाहारगृह आदींमुळे भुसावळ बसस्थानकाची स्थिती अतिशय बकाल झाली आहे. बसस्थानकाच्या भिंती धूळ आणि जळमटे यांमुळे काळवंडल्या आहेत. बसस्थानकावरील खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. पंखे धुळीने माखले आहेत. भित्तीपत्रके चिकटवल्यामुळे बसस्थानकाच्या भिंती आणि सिमेंटचे खांब विद्रूप झाले आहेत.
प्रवाशांना बसण्यासाठी बाकड्यांची संख्या जमतेम आहे. त्यातही बहुतांश वेळा त्यावर कुत्री बसलेली असतात. त्यामुळे गाड्यांची वाट पहात प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते. त्यामुळ वृद्ध व्यक्तींना अधिकच त्रास सहन करावा लागतो. बसस्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्यांतील एकही गाडी सुस्थितीत नाही. हेडलाईट तुटलेल्या, पत्रे चेपलेल्या, आसने काळवंडलेल्या अशा या गाड्या आहेत. बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही. बसस्थानकाचे उपाहारगृह बंद आहे. उपहारगृहाच्या इमारतीचे बांधकाम ढासळले असून इमारत अतिशय जीर्ण झाली आहे.
वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे बसस्थानकाच्या परिसरात खासगी दुचाकी गाड्या इतरत्र अव्यवस्थितपणे लावण्यात येतात. कचराकुंड्या नसल्यामुळे बसस्थानकाच्या परिसरात इतरत्र कचरा टाकला जात आहे.
बसस्थानकात खडीकरणाचा सोपस्कार !
बसस्थानकाच्या परिसरात खडीकरण (केवळ खडी टाकणे) करण्यात आले आहे; मात्र डांबरीकरण झालेले नाही. खडीकरणाचे कामही व्यवस्थित करण्यात आलेले नाही. खडीकरणातील बरीचशी खडी बसस्थानकात पसरली आहे. त्यावरून चालणे प्रवाशांना त्रासदायक बनले आहे.
बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा !
आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्वीटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सअप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा. |