पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्रोत ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

दलाली रोखण्यासाठी प्रयत्न करणार

गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्रोत आहे, ‘पर्यटन !’

पणजी – पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्रोत आहे आणि यातील सेवांमध्ये एकरूपता आणणे हे उद्दिष्ट आहे, असे विधान पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी येथे केले. ते पुढे म्हणाले, आमच्या पाहुण्यांसाठी सेवांमध्ये एकसमानता आणणे, हे माझे उद्दिष्ट आहे. कुणीही पर्यटकांचा गैरलाभ घेऊ नये आणि त्यांची फसवणूक करू नये. त्यामुळे गोव्याची अपकीर्ती होईल.

दलाल पर्यटकांची फसवणूक करतात आणि आमच्या वॉटरस्पोटर्स चालवणार्‍यांच्या कमाईचाही वाटा हडप करतात

दलाल पर्यटकांची फसवणूक करतात आणि आमच्या वॉटरस्पोटर्स चालवणार्‍यांच्या कमाईचाही वाटा हडप करतात. गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या सरकारी आस्थापनाच्या साहाय्याने तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आणण्याचा माझा हेतू आहे. ज्यामध्ये आमचे वॉटरस्पोटर्स चालवणारे दलालामार्फत पर्यटकांशी संपर्क करून त्यांना दलाली न देता थेट पर्यटन खात्याशी संवाद साधतील.

गोमंतकियांनी हे समजून घेतले पाहिजे की, हे दलाल बहुतेक वेश्याव्यवसाय, अमली पदार्थ, दरोडे इत्यादींमध्ये गुंतलेले गुन्हेगार आहेत आणि त्यांची खरी ओळख लपवण्यासाठी वॉटरस्पोटर्सचा ढाल म्हणून वापर करतात. दुर्दैव म्हणजे काही आमदारदेखील आमच्या जलक्रीडा बांधवांची दिशाभूल करत आहेत आणि गोव्यात सुरक्षित पर्यटन देण्याचा विचार न करता त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय लाभासाठी या दलालांना आश्रय देत आहेत. असे करून हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी गोव्याच्या पर्यटन उद्योगाला उद्ध्वस्त  करत आहेत.