हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग !’

मेधा-दक्षिणामूर्ति यागाचे यज्ञकुंड

देवद (पनवेल), १८ मार्च (वार्ता.) – सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात फाल्गुन कृष्ण दशमी, म्हणजेच १७ मार्च या दिवशी भगवान शिवाचे गुरुरूप असलेल्या श्री दक्षिणामूर्ति या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी आणि महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडलेल्या या यज्ञसोहळ्याचे पौरोहित्य सनातनचे पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर, श्री. अमर जोशी आणि श्री. ईशान जोशी यांनी केले.

यज्ञाच्या आरंभी शांतीसूक्त म्हणण्यात आले. समिधा, चरू (शिजवलेला भात) आणि घृत (तूप) यांच्या आहुती या वेळी देण्यात आल्या. पूर्णाहुती झाल्यानंतर ‘श्री दक्षिणामूर्ति’ देवतेची भावपूर्ण आरती करून चैतन्यदायी सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर सद्गुरु, संत आणि साधक यांनी यज्ञनारायणाचे अन् देवतांचे दर्शन घेतले.

या यज्ञविधींचा कार्यकारणभाव ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक श्री. विनायक शानभाग यांनी सहजसोप्या शैलीत सांगितला. अत्यंत भावपूर्णरित्या केलेल्या निवेदनातून त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत कालगतीनुसार, तसेच आपत्काळाच्या दृष्टीने या यज्ञसोहळ्याचे महत्त्व विषद केले. त्यांच्या दैवी वाणीमुळे सर्वांनाच हा सोहळा भावाच्या स्तरावर अनुभवता आला.

समष्टीकल्याणार्थ दशदिक्पाल पूजन !

१६ मार्च या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या पुरोहितांनी ‘दशदिक्पाल पूजन’ केले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या निर्मितीतील अडथळे दूर होऊन लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, तसेच सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होऊन त्यांचे रक्षण व्हावे’, या उद्देशांनी हे पूजन करण्यात आले.

सोहळ्याला उपस्थित सनातनचे सद्गुरु आणि संत !

सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर, सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. शिवाजी वटकर, पू. रमेश गडकरी, पू. गुरुनाथ दाभोलकर, पू. (सौ.) संगीता जाधव, पू. (सौ.) अश्विनी पवार आणि पू. रत्नमाला दळवी यांची वंदनीय उपस्थिती लाभली, तर पू. बलभीम येळेगावकर आणि पू. दत्तात्रेय देशपांडे यांनी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून यज्ञसोहळा पाहिला.

१७ मार्चला पार पडलेला ‘दक्षिणामूर्ति याग’ हा सूक्ष्मातील धर्मलढ्यातील एक शंखनादच !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९० मध्येच कालगतीनुसार धर्म विरुद्ध अधर्म या सूक्ष्मातील लढ्याचे रणशिंग फुंकले !

सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनी सांगितल्यानुसार साक्षात् श्रीमन्नारायणाचे अवतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९० मध्येच कालगतीनुसार धर्म विरुद्ध अधर्म या सूक्ष्मातील लढ्याचे रणशिंग फुंकले ! युगानुयुगे चालू असलेल्या धर्मसंस्थापनेच्या चक्रात सध्या कलियुगांतर्गत सहाव्या कलियुगातील धर्मसंस्थापनेचा काळ समीप आला आहे. तत्पूर्वीच्या या लढ्याचाच एक भाग म्हणून सनातनच्या आश्रमांत आतापर्यंत ४८० हून अधिक यज्ञ करण्यात आले. सनातनच्या देवद (पनवेल) येथे १७ मार्च या दिवशी पार पडलेला ‘दक्षिणामूर्ति याग’ हाही या सूक्ष्मातील धर्मलढ्यातील एक शंखनादच होता !

भगवान शिवाचे रूप असलेले आदिगुरु श्री दक्षिणामूर्ति !

शिष्यगणांसमवेत श्री दक्षिणामूर्ति

वटविटपिसमीपे भूमिभागे निषण्णं
सकलमुनिजनानां ज्ञानदातारमारात् ।

त्रिभुवनगुरुमीशं दक्षिणामूर्तिदेवं
जननमरणदुःखच्छेददक्षं नमामि ।।

अर्थ : जे वटवृक्षाखाली भूमीवर बसले आहेत, ज्या ज्ञानदात्याच्या जवळ मुनीजन बसले आहेत, जे दक्षिणामूर्ति तिन्ही लोकांचे गुरु आहेत, त्या जन्म-मरणाच्या दुःखाने भरलेल्या चक्राला नष्ट करणार्‍या देवाला मी नमन करतो.

सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवाचे पुत्र कनक, कनंदन, सनातन आणि सनत्कुमार हे ४ मानसपुत्र निर्माण झाले. त्यांना सृष्टीचे सृजन करण्यास सांगितल्यावर या ४ पुत्रांनी सांगितले की, आम्हाला आत्मतत्त्वाचे ज्ञान जाणून घ्यायचे आहे. त्यानंतर हे निवृत्तीमार्गी ऋषी (ब्रह्मदेवाचे मानसपुत्र) उत्तर दिशेला तोंड करून चालत राहिले. अतीउत्तर दिशेला असलेल्या मानस सरोवराजवळ दिव्य वटवृक्षाच्या छायेत भगवान शिव गुरुरूपात शिळेवर विराजमान होते. श्री दक्षिणामूर्तींच्या कृपेने या चारही ऋषींना ज्ञान प्राप्त झाले. अशा प्रकारे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळचे श्री दक्षिणामूर्ति हे पहिले गुरुरूप होय ! म्हणून भगवान शिव हे आदिगुरु आहेत !

भगवान शिवाच्या पायाखाली असलेला राक्षस म्हणजे ‘मद, मोह, अहंकार आदी षड्रिपूंना सदैव कह्यात ठेवले पाहिजे’ याचे, म्हणजेच संयमाचे, इंद्रियनिग्रहाचे प्रतीक आहे. या रूपातील शिवाला ४ हात असून एका हातात माळ आहे, एक हात ज्ञानमुद्रेचा आहे, एका हातात मशाल आहे, तर एका हातात ‘ज्ञाना’चे प्रतीक असलेले वेद आहेत.

यज्ञामुळे आश्रमात निर्माण झालेले मंगलमय वातावरण !

१. ‘मेधा-दक्षिणामूर्ति यागा’तील हाविर्भावाच्या वेळी म्हणण्यात येणार्‍या मंत्रपठणाच्या ओजस्वी ध्वनीची स्पंदने संपूर्ण आश्रमात पसरल्याने आश्रमातील चैतन्य वृद्धींगत झाले.

२. गोमयाने सारवलेल्या यज्ञस्थळी लावलेले केळीचे खांब, तोरणे यांमुळे मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते.

३. यज्ञाच्या निमित्ताने आश्रमात विविध ठिकाणी केलेली तेजस्वी पणत्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि सात्त्विक रांगोळ्या यांतूनही आश्रमात चैतन्य प्रक्षेपित होत होते.

श्री दक्षिणामूर्तींचे आयुध असलेल्या मशाली यज्ञापूर्वी ३ दिवस अर्पणस्वरूपात मिळणे !

श्री. विनायक शानभाग

‘यज्ञसोहळ्याच्या ३ दिवस आधी ३ मशाली सोलापूर येथून देवद आश्रमात आल्या. ‘यज्ञाची देवता असलेल्या श्री दक्षिणामूर्ति गुरुरूप शिवाच्या एका हातातही मशाल आहे. यज्ञसोहळ्याच्या पूर्वीच मिळालेल्या या मशालींच्या माध्यमातून यज्ञसोहळ्याला भगवंताचा आशीर्वादच लाभला आहे’, असे साधकांना जाणवले. ‘३ मशाली म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचेच प्रतीक असल्याचे साधकांना जाणवले. १६ मार्च या दिवशी ‘दशदिक्पाल पूजना’च्या पूर्वी पुष्कळ पाऊस पडूनही यज्ञस्थळी लावलेल्या या मशाली तेवत राहिल्या.’

– श्री. विनायक शानभाग (१७.३.२०२३)

सनातनच्या कार्यातील देवद आश्रमाचे महात्म्य !

देवद आश्रम

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष २००३ मध्ये देवद आश्रमातूनच साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या दृष्टीने ‘शुद्धीकरण मोहिमे’ला (सत्संगांच्या माध्यमातून) आरंभ केला होता. साधकांना त्यातून अध्यात्मरूपी ज्ञान झाले. आजही ‘ज्ञान’ देणार्‍या गुरुरूपाचे प्रतीक असलेल्या श्री दक्षिणामूर्ति देवतेसाठीचा याग याच आश्रमात पार पडला.’

– श्री. विनायक शानभाग (१७.३.२०२३)

…असा अनुभवला देवद आश्रमातील साधकांनी यज्ञ सोहळा !

सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमामध्ये सोहळ्याची सिद्धता चालू झाली; पण कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी साधकांना तितकी कल्पना नव्हती. प्रत्येकजण ‘काय असेल ?’, याविषयी मनातल्या मनात अंदाज बांधत होता. असे असतांनाही आश्रम आणि आश्रम परिसरातील वातावरणातील चैतन्यामध्ये वाढ होत होती. सर्व साधकांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला होता. ३ दिवस अगोदर ‘आश्रमामध्ये विधी असणार आहेत’, असे सांगण्यात आले आणि दुसर्‍या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे आगमन झाले. सायंकाळच्या वेळी त्यांचे आगमन झाल्यानंतर आश्रमातील वातावरण पूर्णच पालटून गेले. चैतन्यामध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. त्या दिवशी पुष्कळ ऊन होते, तरीही वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. आल्हाददायक वारे वाहू लागले. त्यानंतर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आल्यानंतर सर्वांच्याच आनंदामध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. ‘रामनाथी आश्रमामध्येच यज्ञविधी होतात. देवद आश्रमामध्ये यज्ञ कधी होणार ?’, ही साधकांची प्रतीक्षा संपून १७ मार्च या दिवशी न ‘भूतो न भविष्यति’ असा यज्ञ पार पडला. गुरुमाऊलींच्या कृपेने यज्ञानंतर सर्वांना पुष्कळ प्रमाणात ऊर्जा आणि चैतन्य मिळाले. प्रत्येकालाच याविषयी कशी कृतज्ञता व्यक्त करायची ?, हेच समजत नव्हते. अशा प्रकारे सर्वजण वेगळ्याच भावविश्वात गेले.

‘मेधा-दक्षिणामूर्ति यागा’च्या भावसोहळ्याची चैतन्यदायी छायाचित्रे !

डावीकडे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा मध्यभागी गुरुरूप शिवाचे प्रतीक असलेला कलश आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असलेल्या ४ शिष्यांचे प्रतीक असलेले ४ कलश अन् उजवीकडे गुरुरूप शिवाकडून ज्ञान ग्रहण करत असलेल्या शिष्यांसमवेतची प्रतिमा

निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणाम् ।
गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः ।।

अर्थ : जो सर्व विद्यांचे निधान (भांडार) आहे, विश्वातील सर्व रोगांचा उपचारक (औषधी) आहे, त्या सर्व लोकांचे गुरु असणार्‍या दक्षिणामूर्ति यांना नमस्कार असो.

देवद आश्रमातील दोन इमारतींना जोडणार्‍या पुलावरील दिवे आणि पुष्पे यांची ही वैशिष्ट्यपूर्ण रचना !

तेजस्वी ज्योती अंधःकारा दूर सारती ।
प्रक्षेपिती चैतन्य अन् दैवी साक्ष देती ।।

देवद आश्रमातील परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चैतन्यदायी खोलीबाहेरील पणत्यांची ही तेजस्वी मांडणी !

‘साधनेच्या प्रवासात दिशादर्शन करणारा गुरुरूपी चैतन्यमय दीप साधकांच्या साधनामार्गातील अडथळे दूर करून त्यांचे जीवनपथ उजळून टाकणार आहे’, असेच अंधार नष्ट करणारे हे दीप साधकांना सांगत आहेत !

‘मेधा-दक्षिणामूर्ति यागा’नंतर यज्ञस्थळी आरती करत असतांना डावीकडून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या समवेत सनातनचे पुरोहित श्री. ईशान जोशी अन् श्री. अमर जोशी

ॐ नमः प्रणवार्थाय शुद्धज्ञानैकमूर्तये ।
निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः ।

अर्थ : जे प्रणवाचा (ओंकाराचा) अर्थ आणि शुद्ध अद्वैत ज्ञानाचे मूर्त रूप आहेत, अशा निर्मळ अन् शांत  दक्षिणामूर्तींना माझा नमस्कार असो.

यज्ञ सोहळ्याचे चैतन्य वाढविती ।
तेजोमय असती पणत्यांच्या ज्योती ।।

‘साधकांनी संघटितपणे आणि चिकाटीने केलेली व्यष्टी अन् समष्टी साधना त्यांना अंतिम ध्येयापर्यंत पोचवेल’, असाच भावसंवाद जणू या स्वस्तिकातील चैतन्याने भारीत झालेले दीप साधकांशी साधत आहेत !