जागतिक आतंकवादी संघटनांच्या सूचीमध्ये भारतातील ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी)’ १२ व्या स्थानावर !

जागतिक आतंकवाद निर्देशांक २०२२

नवी देहली – आस्ट्रेलियातील सिडनी येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस’ने आतंकवादी कारवायांच्या संदर्भात ‘ग्लोबल टेररिझम् इंडेक्स २०२२’ (जागतिक आतंकवाद निर्देशांक २०२२) अंतर्गत २० प्रमुख आतंकवादी संघटनांची सूची प्रसिद्ध केली आहे. यात भारतातील ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी)’ १२ व्या क्रमांकावर आहे; मात्र यात ही माओवादी आहे कि राजकीय पक्ष आहे ? हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. माओवादी कम्युनिस्ट पार्टी नक्षलवादी कारवाया करते. त्यामुळे ही माओवादी कम्युनिस्ट पार्टी असल्याचे सांगितले जात आहे. वर्ष २००४ मध्ये सीपीआय-एम्एल्, माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर आणि पीपल्स फॉर ग्रुप यांनी एकत्रित येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) ही संघटना बनवली होती. या संघटनेवर भारतामध्ये वर्ष २००९ मध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. वर्ष २०२२ मध्ये या संघटनेने ६१ आक्रमणे केली, ज्यात ३९ लोकांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण घायाळ झाले.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या संघटनेने तत्कालीन प्रमुख विनोद मिश्रा याच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला आहे. त्यामुळे नंतर रणवीर सेनेचा उदय झाला. सध्या बिहार आणि झारखंड राज्यांत माओवादी संघटना सक्रीय आहे.

संपादकीय भूमिका

हिंसाचार, हत्या, खंडणी हाच मार्क्सवाद्यांचा जगभरातील इतिहास राहिलेला आहे. त्यामुळेच तो रशियातून नष्ट झाला आणि भारतातही काही ठिकाणांपुरताच मर्यादित राहिला आहे. भविष्यात तो जागतिक स्तरावरून नष्ट होणार यात शंका नाही !