अलंकापुरीत तुकाराम बीज उत्‍सव उत्‍साहात साजरा !

पुणे – आळंदी येथे १२ मार्च या दिवशी वारकरी साहित्‍य परिषदेच्‍या वतीने ‘तुकाराम बीज उत्‍सव’ उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. या वेळी वारकरी शिक्षण संस्‍थेच्‍या २ सहस्र विद्यार्थ्‍यांनी संतश्र्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज समाधी मंदिरापासून मावळ तालुका धर्मशाळेपर्यंत भव्‍य दिंडीचे आयोजन केले.

आळंदी येथील कबीर मठाचे प्रमुख ह.भ.प. चैतन्‍य महाराज कबीर बुवा, ह.भ.प. नरहरी बुवा चौधरी, ह.भ.प. महादेव महाराज शहाबाजकर, ह.भ.प. प्रशांत महाराज देहूकर यांच्‍या उपस्‍थितीत हा सोहळा पार पडला. मावळ तालुका धर्मशाळेमध्‍ये ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी), ह.भ.प. चैतन्‍य महाराज कबीर बुवा, ह.भ.प. नरहरी बुवा चौधरी यांनी जगद़्‍गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्‍या जीवनावर मनोगत व्‍यक्‍त केले. यानंतर वारकरी साहित्‍य परिषदेचे अध्‍यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी) यांच्‍या वाढदिवसानिमित्त त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.