अमेरिकेत आता सिग्नेचर बँकेला टाळे !

तीन दिवसांत दुसरी बँक दिवाळखोरीत !

न्यूयॉर्क – अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँकेपाठोपाठ आता सिग्नेचर बँकेला टाळे ठोकण्यात आले आहे. सिग्नेचर ही न्यूयॉर्कमधील एक प्रादेशिक बँक आहे. सप्टेंबर २०२२ पर्यंत सिग्नेचर बँकेच्या धनसंचयापैकी एक चतुर्थांश वाटा हा ‘क्रिप्टो करन्सी’ अर्थात् अभासी चलनाचा होता. बँकेने तो न्यून करण्याची घोषणा करताच त्याच्या समभागांत (शेअर्समध्ये) १० मार्चला मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले. सिग्नेचर बँकेला लावण्यात आलेले टाळे हे तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याचे सांगितले जात आहे.
‘न्यूयॉक राज्य सेवा वित्त विभागा’ने दिलेल्या माहितीनुसार ‘फेडरल डिपॉझिट इन्शुअरन्स कॉर्पोरेशन’ने (‘एफ्.डी.आय.सी.’ने) सिग्नेचर बँक कह्यात घेतली आहे. सिग्नेचर बँकेकडे मागील आर्थिक वर्षाअंती ११० अरब डॉलर्स इतकी संपत्ती होती, तर ठेव रक्कम ८८.५९ अरब डॉलर्स इतकी होती. अमेरिकेच्या कोषागार विभागाने ‘सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर या दोन्ही बँकांच्या ठेवीदारांची कुठलीही हानी होणार नाही’, असे आश्‍वासन दिले आहे.