महिलांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! – प्रा. वृषाली मगदूम

वाशी – देशभरात महिलांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याने महिलांची स्थिती सुधारत आहे कि बिघडली आहे ? हे लक्षात येते, असे मत ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या विश्वस्त प्रा. वृषाली मगदूम यांनी वाशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. नवी मुंबईतील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने महिलादिनानिमित्त वाशी रेल्वेस्थानक ते वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली होती. या फेरीच्या सांगतेच्या वेळी त्या बोलत होत्या.

प्रा. वृषाली मगदूम म्हणाल्या…

१. सरकारने आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचा शासन आदेश काढला आहे. हा आदेश समाजात फूट पाडणारा असल्याने तो मागे घेतला जावा. (असे बोलून प्रा. मगदूम अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करत आहेत, असे वाटल्यास नवल ते काय ? – संपादक) आपण मानवी मूल्यावर विश्वास ठेवणारे लोक आहोत; मात्र सध्या राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. त्यामुळे आपला आवाज सरकारपर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

२. सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक गोष्टी उपलब्ध केल्या आहेत; परंतु त्यातील तरतुदींची पूर्तता न होणे, उदा. प्रोटेक्शन ऑफिसर, ‘निर्भया निधी’ शासनाकडून वापरला न जाणे, निधी वेळेवर उपलब्ध न होणे, आधार केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा नसणे इत्यादी अडचणी येत आहेत.

अल्पवयीन मुलींवर होणार्‍या बलात्काराची प्रकरणे घडल्यावर मुलींच्या पोषाखावरून घरी येण्याच्या वेळेवरून, आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्नांवरून समाजातील काही उत्तरदायी व्यक्ती मुलींनाच उत्तरदायी मानतात. याचा परिणाम मुलींवरची स्त्रियांवरची बंधने वाढण्यात होतो. महिलांच्या स्वातंत्र्यावर अशा प्रकारे अंकुश ठेवणार्‍या प्रवृत्तीचा या फेरीत निषेध व्यक्त करण्यात आला.