दाऊदसारखे आतंकवादी मारण्यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञांकडून नवीन तंत्रज्ञानाचा शोध !

अमेरिकेच्या शास्त्रज्ञांकडून त्यांच्या वायूदलासाठी एक ड्रोन सिद्ध करण्यात येत आहे. हे ड्रोन मनुष्याचे तोंडवळे (चेहरे) ओळखून त्यांना लक्ष्य करण्याचे काम करील. हे ड्रोन आकाशातून खाली भूमीवर लपलेल्या आतंकवाद्याचा शोध घेईल. त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्यावर एक लहान क्षेपणास्त्र सोडले जाईल की, ज्याने तो आतंकवादी मारला जाईल. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाईल ? याविषयीची माहिती या लेखात जाणून घेऊया.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. अमेरिकी शास्त्रज्ञांकडून आतंकवाद्यांना ठार मारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध

अमेरिकेने अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे, ज्यानुसार ‘आर्टिफिशिअल इंटलिजन्स’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ड्रोनवर एक ‘सॉफ्टवेअर’ बसवण्यात येईल. त्या माध्यमातून आतंकवाद्यांना लक्ष करण्यात येईल. आतंकवादी हे शहरे, इमारती, जंगले किंवा गुहा अशा विविध ठिकाणी लपलेले असतात. त्यामुळे आधी त्यांचा शोध घ्यावा लागतो. आतंकवाद्याच्या जवळपास त्याचे नातेवाइक किंवा अन्य लोक असल्यास क्षेपणास्त्राच्या आक्रमणात असे निरपराध मारले जाऊ नयेत; म्हणून नेमका आतंकवादी चिन्हित करण्यासाठी ‘फेशिअल रिकग्नेशन सॉफ्टवेअर’ (चेहरा ओळखू येण्यासाठीची प्रणाली) या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्या माध्यमातून आतंकवाद्याच्या छायाचित्रांच्या साहाय्याने ड्रोनवरील छायाचित्रक त्याचा शोध घेतो. या छायाचित्रकांची अचूकता ९० टक्के एवढी आहे. दाढी वाढल्यामुळे किंवा अन्य मार्गाने आतंकवाद्याच्या चेहर्‍यात पालट झाला, तर या अचूकतेत थोडी तफावत येऊ शकते. ‘डेटाबेस’मध्ये असलेल्या आतंकवाद्याच्या चेहर्‍याशी भूमीवरील व्यक्तीचा चेहरा जुळत नसल्यास तेथे हे तंत्रज्ञान अयशस्वी होऊ शकते. त्यामुळे संबंधित आतंकवाद्याचे अद्ययावत् छायाचित्र मिळणे आवश्यक असते.

२. आतंकवाद्याचा शोध घेण्याची ड्रोनची पद्धत

आपण बहिरी ससाणा नावाचा पक्षी आकाशात घिरट्या घालत असतांना पाहिला असेल. त्याला भूमीवर पाहिजे असलेले लक्ष्य समोर दिसते, तेव्हा तो अचानक भक्ष्यावर झडप घालून त्याला उचलून घेऊन जातो. या ड्रोनची कार्यपद्धत बहिरी ससाण्याप्रमाणेच असणार आहे. तेही ससाण्याप्रमाणे आकाशात घिरट्या घालत असेल; पण लहान असल्याने ते भूमीवर असलेल्यांना दिसू शकणार नाही. या तंत्रज्ञानात ‘आर्टिफिशिअल इंटलिजन्स’चा वापर केला जाईल. हे ड्रोन आतंकवाद्याचा पाठलाग करील. त्याच्या हालचाली टिपेल. आतंकवादी त्याच्या टप्प्यात येईल, तेव्हा त्याचा वेध घ्यायचा कि नाही ? हे ठरवेल. ‘आर्टिफिशिअल इंटलिजन्स’च्या साहाय्याने तेथील परिस्थितीची माहिती गोळा केली जाईल. त्यानंतर त्याचे विश्लेषण करण्यात येईल.

३. आधुनिक तंत्रज्ञानाचा इस्रायलकडून वापर

अशा प्रकारचे तंत्रज्ञान यापूर्वीही वापरण्यात आले आहे. काही वेळा अचूकतेच्या अभावी निराळीच माणसे मारली गेली. अशा प्रकारचे तंत्रज्ञान इस्रायलने वापरल्याचे म्हटले जाते. एकदा इस्रायलला इराणच्या मोठ्या जनरलला मारायचे होते. तो १०-१२ गाड्यांच्या ताफ्यातून जात होता. तेव्हा इस्रायलच्या ड्रोनने त्याचा पाठलाग केला. त्याच्या नेमक्या गाडीचा शोध घेतला आणि त्या गाडीच्या खिडकीतून एका क्षेपणास्त्राने त्याचा वेध घेतला. अशा प्रकारे तो जनरल मारला गेला. अशाच प्रकारे काही शास्त्रज्ञही मारला गेल्याचा आरोप इराण करत असतो.

४. आतंकवाद्यांना ठार करण्यासाठी अधिक अचूक तंत्रज्ञान बनवण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न

हे तंत्रज्ञान उपलब्ध असले, तरी येत्या काळात त्याला अधिक अचूक आणि शक्तीशाली बनवण्यात येईल. त्यामुळे समुहातील नेमका आतंकवादीही मारता येईल. यात काही धोके असू शकतात. तंत्रज्ञानाने योग्य काम केले नाही, तर चुकीची माणसेही मारली जाऊ शकतात. अशा प्रकारे एखाद्याचा जीव घेणे अवैध आहे. काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की, म्यानमारच्या जंगलात आतंकवाद्यांची शिबिरे होती. तेथे अचानक एका ड्रोनने येऊन मारा केला. त्यामुळे काही आतंकवादी ठार झाले. ते ड्रोन कसे आले ? हे कुणाला कळलेही नाही. अर्थात् या तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.

हे तंत्रज्ञान कसे कार्य करील ?

‘एस्.ए.एफ्.आर्.’ हे एक ‘व्हिज्युअल इंटलिजन्स प्लॅटफॉर्म’ आहे. ते चेहरा आणि व्यक्ती यांच्या आधारावर संगणकाच्या मार्गदर्शनानुसार काम करते. आस्थापनाच्या मते, यात इतकी क्षमता आहे की, ते १ किलोमीटर अंतरावरूनही एखाद्याचा चेहरा ओळखू शकते. आस्थापनाने अमेरिका वायूदलाशी केलेल्या करारानुसार हे ‘सॉफ्टवेअर’ लहान ड्रोनवर बसवले जाणार आहे. तसेच ते देशाबाहेर विशेष अभियानांसाठी वापरले जाणार आहे.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन