बीड जिल्ह्यात प्रथमच काही दिवसांपूर्वी महिला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी पदभार स्वीकारला. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी स्वत:च्या अधिकारांचा अपेक्षित असा वापर करत नसल्याने जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास अद्याप झालेला नाही, असा अप्रसन्नतेचा सूर जिल्ह्यातील सामान्य जनतेतून दिसत आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती होणे, हे कौतुकास्पद आहे. बीड जिल्ह्याच्या इतिहासात आतापर्यंत ४० जिल्हाधिकार्यांच्या सूचीमध्ये प्रथमच महिला जिल्हाधिकार्यांच्या हाती सूत्रे आली आहेत. यापूर्वी धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून धाराशिववासियांच्या मनावर त्यांनी ‘चांगली कामे करून’ उत्तम छाप टाकली आहे.
बीड जिल्ह्यातील सद्यःस्थिती पहाता गुन्हेगारी, महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, घरगुती हिंसा, अवैध गर्भपात, बालविवाह या घटना सर्रास घडत आहेत, तसेच जिल्ह्यातील अन्य समस्याही ‘आ’ वासून उभ्या आहेत. ‘आतापर्यंतच्या प्रशासकीय अधिकार्यांना राजकीय दबावामुळे किंवा इच्छाशक्तीच्या अभावामुळे विशेष काही धडाकेबाज कामगिरी करता आलेली नसल्यानेच अवैध प्रकारांनी परिसीमा गाठली आहे’, असे सामान्य जनतेचे मत आहे. असे असतांनाही या गैरप्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य प्रशासनाला एका महिला जिल्हाधिकार्याची नियुक्ती करावीशी वाटणे, या कामगिरीसाठी महिलेला पात्र ठरवणे, हा ‘नारीशक्ती’चा विजयच म्हणावा लागेल. असे असले, तरी आतापर्यंतच्या जिल्हाधिकार्यांना जिल्ह्याची स्थिती चांगली न करण्यात काय अडचणी आल्या ? याचाही अभ्यास होणे आवश्यक आहे.
नूतन जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी नुकतेच भूसंपादन विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी अहवाल सिद्ध करणारे श्रीनिवास मुळे यांच्यावर शासकीय कामात दिरंगाई केल्याने निलंबनाची कार्यवाही केली आहे. मुधोळ-मुंडे यांनी बीड येथे पदभार स्वीकारला तेव्हाच ‘भ्रष्ट अधिकार्यांची गय केली जाणार नाही’, असे ठणकावून सांगितले होते. भारतीय संस्कृतीमध्ये ‘स्त्री’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्याच्या आधुनिक काळातही स्त्री स्वत:चे सर्व दायित्व उत्तमरित्या पार पाडत विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने काम करून समाजमनावर ठसा उमटवत आहे. बीड जिल्ह्यात प्रथमच महिला जिल्हाधिकार्याची नियुक्ती होऊन तेथील अराजकतेची पाळेमुळे समूळ नष्ट करण्यासाठी दीपा मुधोळ-मुंडे या सक्षमरित्या कार्य करू शकतील, याची जनतेला खात्री वाटते.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर