राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ‘लव्ह जिहाद’च्या हिंदुविरोधी षड्यंत्राला ‘आंतरधर्मीय विवाह’ ठरवण्याचा प्रयत्न !

शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांच्या रोखठोक प्रत्युत्तरामुळे आव्हाड निरुत्तर !

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम करू नका. तुम्ही ज्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणता, त्याला आम्ही ‘आंतरधर्मीय विवाह’ म्हणतो, अशा शब्दांत ‘लव्ह जिहाद’च्या हिंदुविरोधी षड्यंत्राला ‘आंतरधर्मीय विवाह’ भासवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला. आव्हाड यांच्या वक्तव्याला भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या आमदारांनी जोरदार प्रत्युत्तर देत त्यांचा निषेध केला.

‘महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या १ लाख घटना घडल्या’, असे वक्तव्य महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत केले होते. यावर १० मार्च या दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी कामकाज पद्धतीविषयक सूत्राद्वारे (‘पॉईंट ऑफ प्रोसेसिंग’द्वारे) महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या १ लाख नव्हे, तर ३ सहस्र ६९३ घटनांची नोंद असल्याचे सांगितले. या वेळी आव्हाड यांनी मंत्री, तसेच शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांवर टीका केली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा दर्शवला.

(म्हणे) ‘लव्ह जिहाद अशी कोणतीही गोष्ट नाही !’ – आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष

मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहाची क्षमा मागावी. चुकीची माहिती देऊ नये, ‘लव्ह जिहाद’ अशी कोणतीही गोष्ट नाही. धर्माच्या आधारे लोकांना भडकवले जात आहे.

मतांच्या लांगूलचालनासाठी बोलणार्‍यांचा निषेध ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री

ज्याची मुलगी लव्ह जिहादला बळी पडते, त्या बापाला आत्महत्येविना पर्याय नाही. लव्ह जिहादमध्ये फसवून मुलींना दुबईत विकले जाते. मतांच्या लांगूलचालनासाठी बोलत असाल, तर हे निषेधार्ह आहे.

लव्ह जिहादची प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

मंत्र्यांवर आरोप करायचे असतील, तर आव्हाड यांनी तशी आधी नोटीस द्यायला हवी.

‘लव्ह जिहाद’विषयी चर्चा करायला आम्ही सिद्ध आहोत. हिंदु मुलींवर होणारा अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी कायदा असलाच पाहिजे. एकाही हिंदु महिलेवर अत्याचार झाला, तरी आम्ही बोलणार. लव्ह जिहादचे हे प्रकरण दाबण्याचा हा प्रकार आहे.

सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जितेंद्र आव्हाड निरुत्तर झाले. या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वादविवाद थांबवण्याचे आवाहन केले.