अलिबाग – येथे १० नोव्हेंबर या दिवशी रेवदंडा गडावर ‘सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग’ विभागाच्या मावळ्यांनी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेत २५ हून अधिक दुर्गसेवकांनी सहभाग घेतला.
गेल्या १४ वर्षांपासून ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ ही संस्था महाराष्ट्रात दुर्ग संवर्धनाचे कार्य अविरतपणे करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर गडदुर्गांच्या डागडुजीसाठी कार्यरत असलेली दुर्ग संवर्धन चळवळ ही संस्थेचे संस्थापक श्री. श्रमिक गोजमगुंडे यांच्या अमूल्य मार्गदर्शनानुसार घेतली जाते. संस्थेने आजपर्यंत १ सहस्राहून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा, तर २ सहस्रांपेक्षा जास्त दुर्गदर्शन मोहिमा राबवलेल्या आहेत.
‘मोहिमेद्वारे गडदुर्गांची स्वच्छता करण्याचे ठरवले आहे. यामुळे गडदुर्ग पर्यटकांसाठी पर्वणी ठरतील’, असे ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ अलिबाग विभागाचे मोहीमप्रमुख श्री. आकाश चिमणे म्हणाले.
या वेळी अध्यक्ष श्री. जितेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष श्री. सन्मेश नाईक, सर्वश्री रक्षित पाटील, तेजस वर्तक, मनोज पारकर, हृषिकेश शिंदे, प्रथमेश धसाडे, स्वप्नील भांजी, आकाश चिमणे, सिद्धार्थ पाटील, सचिन सुर्वे, गौरव सुर्वे, ओंकार पाटील, विहार ठाकूर, श्रेयश घरत, प्रशांत भोईर (उरण) आणि जयेंद्र भोईर (उरण), अपूर्वा, श्रुती वारगे, वैदेही सुर्वे, मेघा पाटील उपस्थित होत्या.