‘भारत हाच जगाचा खरा नेता आहे’, असे तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने म्हटले. खरे पहाता ‘तालिबान आणि भारताचे कौतुक’ हे समीकरण जुळतच नाही; परंतु आता हे समीकरण काहीसे पालटण्याचा तालिबानने प्रयत्न केला आहे. अर्थात् ‘हे पालटणे योग्य दिशेने आहे कि त्या पालटण्यामागील तालिबानचा चेहरा वेगळा आहे’, हे भारताला सांगण्याची आवश्यकता नाही. भुकेकंगाल झालेल्या अफगाणिस्तानातील लोकांसाठी भारताने २० सहस्र मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानमध्ये निःशुल्क पाठवण्याची घोषणा केली. या साहाय्यासाठी तालिबानने भारताचे स्वागत केले. याही आधी भारताने तालिबानशासित अफगाणिस्तानला १.६ मेट्रिक टन वैद्यकीय साहाय्य केले होते. तेव्हाही अफगाणिस्तानने भारताच्या साहाय्याचे स्वागत केले होते. कोरोना महामारीच्या काळातही भारताने अफगाणिस्तानला कोरोना विषाणू प्रतिबंधक लसींचे ५ लाख डोस देणार असल्याचे आश्वासन दिले. भारत नेहमीच मानवतावादी भूमिकेतून परराष्ट्र नीती सांभाळत असतो. या दृष्टीनेच भलेही मग अफगाणिस्तान भारतविरोधी कारवाया करत का असेना, त्यालाही वेळप्रसंगी सहकार्य केले जाते. तालिबानने कितीही स्तुतीसुमने उधळली, भारताचे गोडवे गायले, तरी भारत काही फसणार नाही, हेही तितकेच खरे !
अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे तालिबानने अत्यंत वेगवान हालचाली करून नियंत्रण मिळवले. तालिबानच्या राजवटीच्या आधी अफगाणिस्तान सरकार सत्तेत होते. या पार्श्वभूमीवर भारत आणि तालिबान यांच्यात अजून थेट चर्चा झालेली नाही. यामागे तेथील ऐतिहासिक घडामोडी कारणीभूत आहेत. वर्ष १९९९ मध्ये विमानाचे झालेले अपहरण आणि त्या बदल्यात जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अजहर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद या आतंकवाद्यांना सोडणे ही घटना भारत विसरलेला नाही. असे असतांनाही ‘भारताने तालिबानला साहाय्य करणे ही देशाची उदारमतवादी संस्कृती आहे’, हे तालिबानने लक्षात ठेवावे. या संस्कृतीला धक्का लावण्याचा प्रयत्न जरी केला, तरी भारत तालिबानच्या विरोधात एकवटेल आणि हे तालिबानसाठी महाकठीण होऊन बसेल, हेही तितकेच खरे !
भारताने सतर्क रहावे !
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने वर्ष २०२२ मध्ये ‘भारत आमच्या देशातील त्याचे रखडलेले प्रकल्प पुन्हा चालू करू शकतो’, असे सांगितले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकारने अफगाणिस्तानातील पुनर्निर्माणाशी संबंधित योजनांमध्ये जवळपास ३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. अनेक योजनांमध्ये शेकडो भारतीय काम करत होते. मध्यंतरी तालिबान सत्तेवर आल्यावर अन्यायी-अत्याचारी राजवटीच्या विरोधात अनेक भारतीय तेथून भारतात परतले. आता तालिबानने पुन्हा प्रकल्पपूर्तीची गळ भारताला घातली आहे. ‘या निमंत्रणामागे काही कट तर शिजत नाही ना’, असा संशय अनेकांना आला आहे. त्यामुळे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करू पहाणार्या तालिबानच्या संदर्भात भारताने आपल्या सुरक्षाव्यवस्थेत कोणताही हलगर्जीपणा करता कामा नये. तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर भारताने तेथील दूतावास बंद केला होता. काही मासांपूर्वी पुन्हा तेथे कामास प्रारंभ करण्यात आला आहे. ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्यांनी नुकतेच तेथील रशियन दूतावासाला लक्ष्य केले होते. भारताच्याही संदर्भात असा प्रकार घडल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ? त्यामुळे तालिबानमध्ये कार्यरत असतांना भारताने सतर्कता कायमच बाळगायला हवी.
दुतोंडी तालिबान !
भारताचे कौतुक करणार्या तालिबानने मध्यंतरी ‘जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. आम्ही त्याचा निषेध करत आहोत’, असे म्हटले होते. त्याच्याही आधी एकदा ‘काश्मीर भारताचे अंतर्गत सूत्र आहे’, असे म्हणत तालिबानने स्वतःचा दुतोंडीपणा दाखवून दिला होता. तालिबानला भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसण्याचा अधिकार कुणी दिला ? तालिबानची मानसिकता आतंकवादी आहे. त्यामुळे तालिबानकडून केले जाणारे कौतुक मनावर न घेता भारताने राष्ट्रनिष्ठ राहून पररराष्ट्रनीती जोपासावी. अफगाणिस्तानचे पुनर्वसन आणि पुनर्बांधणी करण्यासाठी तालिबानने चीनला योगदान देण्यास सांगितले होते. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी तर ‘संपूर्ण जगाने अफगाणिस्तानला साहाय्य करावे’, अशी बेधडक भूमिका मांडली होती. भारताच्या बलाढ्य शत्रूराष्ट्राकडून तालिबानची अशा प्रकारे केली जाणारी पाठराखण भारतासाठी धोकादायक आहे. त्यामुळे भारताच्या शत्रूराष्ट्रांशी तालिबानच्या असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारताने सतर्क रहावे; कारण तालिबानचे ‘खायचे आणि दाखवायचे दात वेगळे’ आहेत.
तालिबानकडून अफगाणिस्तानातील नागरिकांवर करण्यात येणार्या अत्याचारांमुळे जगभरातून सर्व स्तरांवर त्याची निर्भत्सना केली जात आहे. असे असतांना जगाने तालिबानला पाठिंबा का बरे द्यावा ? खरेतर आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानवर दबावच आणायला हवा, अन्यथा ‘मैत्री’चा आव आणणार्या तालिबानच्या चेहर्यामागील वेगळाच चेहरा आपल्याला पहावा लागेल. भारतानेही या मैत्रीला भुलू नये. तालिबानची गळाभेटही घेऊ नये. तालिबानचा इतिहास शत्रुत्वाचा आहे. अन्यायकारी वागणूक देणार्या, विश्वासघातकी असणार्या तालिबानच्या संदर्भात ‘दुरून डोंगर साजरे’ अशा भूमिकेत भारताने रहावे ! कट्टरवादी विचारधारा घेऊन वाटचाल करणार्या तालिबानसमवेत व्यवहार करतांना भारताने प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावे. तालिबानने जरी खोटी स्तुती केलेली असली, तरीही भारताने ‘आम्हीच जगाचे खरे नेते आहोत’, हे वास्तव रोखठोक भूमिका घेऊन त्याला वेळोवेळी दाखवून द्यावे !