हनुमान मंदिराच्या परिसरातील दुकानात मटन पोचवण्यास नकार देणार्‍या कर्मचार्‍याला ‘स्विगी’ने नोकरीवरून काढले !

नवी देहली – येथील हनुमान मंदिराजवळ मटन पोचवण्यास नकार दिल्याने ‘स्विगी’ या ऑनलाइन खाद्यपदार्थांचा पुरवठा करणार्‍या आस्थापनाने नोकरीवरून तडकाफडकी काढून टाकल्याचा आरोप या आस्थापनाच्या कर्मचार्‍याने (‘डिलिव्हरी बॉय’ने) केला.

प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, देहलीतील मार्गघाट बाबा हनुमान मंदिराच्या परिसरातील एका दुकानदाराने ‘स्विगी’द्वारे ‘मटण कोरमा’ची मागणी केली होती. यानंतर सदर कर्मचारी ‘मटण कोरमा’ घेऊन दुकानदाराच्या पत्त्यावर पोचला. तेव्हा त्याला ग्राहकाचे ठिकाण हे श्री हनुमान मंदिराच्या आवारात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्या कर्मचार्‍याने तेथे ‘मटण कोरमा’ पोचवण्यास नकार दिला. कर्मचार्‍याने ग्राहकाला मंदिर परिसराच्या बाहेर येऊन ‘मटण कोरमा’ घेऊन जाण्याची विनंती केली; मात्र ग्राहकाने ती अमान्य केली. ज्या गोष्टी कर्मचार्‍याने ग्राहकाला समजावण्याचा प्रयत्न केला, त्याच गोष्टी ग्राहकाने आस्थापनाला सांगितल्या. या घटनेनंतर ‘स्विगी’ने कर्मचार्‍याला कामावरून काढून टाकले. ‘स्विगी’ने मात्र कर्मचार्‍याचा आरोप फेटाळून लावला आहे.

हनुमान मंदिराच्या व्यवस्थापनाकडून कर्मचार्‍याचा सत्कार

दुसरीकडे श्री हनुमान मंदिराच्या व्यवस्थापनाने त्या कर्मचार्‍याचे कौतुक करून त्याचा सत्कार केला.