छत्रपती शिवाजी महाराज यांचे युगप्रवर्तक कार्य

शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या युगप्रवर्तक कार्याचे आकलन व्यवस्थित होण्यासाठी शिवपूर्वकाळाचा अभ्यास अन् सर्वांगाचे आकलन केल्याविना त्यांचे उत्तुंग कार्य संपूर्ण कळणे शक्य नाही. शिवपूर्वकाळाचा विचार करतांना भारताच्या भूतकाळात जाऊन इतिहासाचे विवेचन करावे लागते. ते विवेचन योग्य पद्धतीने आणि इतिहासाचे मर्म जाणल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्य स्थापनेमुळे देशभर काय परिणाम झाला ? आणि देश, धर्म अन् संस्कृती यांचे रक्षण कशा पद्धतीने झाले ? हे लक्षात येऊ शकेल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांनीही ‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, तर पाकिस्तानची सीमा फार दूर नसून अगदी आपल्या घरापर्यंत पोचली असती’, असे म्हटले होते.

अधिवक्ता सतीश देशपांडे

१. शिवपूर्वकाळातील युद्धपद्धत आणि परकीय आक्रमक वापरत असलेली विध्वंसक युद्धनीती

शिवपूर्वकाळात त्यामागील ८०० ते १ सहस्र वर्षाच्या इतिहासाचे वरवर तरी आकलन करावे लागते. शिवपूर्व भारतात बरीचशी राजघराणी आपापल्या प्रदेशावर राज्य करत असत. साधारणपणे सर्वांत निर्णायक आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घडामोड म्हणजे इ.स. ७१२ मध्ये सिंध प्रांतावर महंमद बिन कासिमने केलेले यशस्वी निर्णायक आक्रमण की, ज्यामुळे भारताच्या इतिहासावर सखोल आणि आमूलाग्र प्रभाव पडला. त्याचे कटू परिणाम आपण आजही अनुभवत आहोत. इ.स. ७१२ मध्ये सिंध राज्याच्या राजा दाहीरचा पराभव झाला आणि तेथे महंमद बिन कासिमने खलिफाची सत्ता स्थापित केली.

महंमद बिन कासिमच्या आक्रमणापूर्वीही भारतीय राज्यांमध्ये युद्ध होत असे. त्यामध्ये लष्कर युद्ध करत असे; पण त्याचा सामान्य नागरिकांवर परिणाम म्हणजे विजेत्या राज्याला जोडलेल्या भौगोलिक प्रदेशांतील नागरिकांना राज्यास द्यावा लागणारा कर यातच फरक पडत असे. पूर्वापार पारंपरिक आणि दीर्घकालीन युद्धनीतीनुसार भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही युद्धानंतर कधीही स्त्रियांची विटंबना होत नसे. सर्वथा प्रत्येक भारतीय राज्यांमधील युद्धांमध्ये हरलेल्या राज्याच्या स्त्रियांचा अपमान होणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जात असे. तसेच इतर नैतिक बंधनेही युद्धनीतीमध्ये समाविष्ट केलेली होती आणि त्या युद्धनीतीचे पालन करणे सर्वतः आदर्श समजले जात असे; परंतु महंमद बिन कासिमच्या आक्रमणामुळे परकीय आक्रमकांना कुठल्याही युद्धनीतीचे सुवेरसुतक नव्हते.

२. चालुक्य राजाने गुजरात सीमेवर महंमद बिन कासिमचा पराभव करणे

वरील आक्रमणामुळे सर्वप्रथमच फार मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांच्या कत्तली, प्रचंड प्रमाणात भारतीय स्त्रियांची विटंबना झाली आणि लाखो भारतीय स्त्रियांना गुलाम बनवण्यात आले. खुद्द राजा दाहीरच्या कन्या खलिफास भेट करण्यात आल्या आणि त्यानंतर प्रत्येक परकीय आक्रमणानंतर न्यूनाधिक हाच अनुभव देशभरातील सर्व जनतेस येऊ लागला. यातूनच पुढे स्त्रियांचा अग्नीप्रवेश इत्यादी प्रथा पुढे आल्या. महंमद बिन कासिमने सिंध विजयानंतर गुजरात मार्गे महाराष्ट्रातही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता; पण तत्कालीन महाराष्ट्रातील चालुक्य राजाने गुजरात सीमेवर महंमद बिन कासिमचा पुष्कळ मोठा पराभव केल्याने त्याचा महाराष्ट्र प्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळे परकीय आक्रमकांना पुढे दक्षिणेत प्रवेश घेण्यास पुढील ५०० वर्षे वाट पहावी लागली.

३. परकीय आक्रमकांमुळे देश, धर्म आणि संस्कृती नष्ट होण्याची स्थिती उद्भवणे

परकीय आक्रमकांशी राजपूतांनी दीर्घ प्रतिकार केला; पण खिलजीच्या सत्ताकाळात देवगिरीच्या पाडावामुळे परकीय आक्रमकांनी महाराष्ट्र आणि दक्षिणेत प्रवेश केला. येथून जवळपास २५० ते ३०० वर्ष महाराष्ट्रासह दक्षिण हिंदुस्थान या भयावह राजकीय विपन्न अवस्थेमध्ये सापडला. या परिस्थितीमुळे दक्षिणेत स्वराज्य म्हणून देश, धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यास कुठलीही शक्ती शिल्लक राहिली नाही. त्या वेळी देश, धर्म आणि संस्कृती नष्ट होईल कि काय ? अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. अशा भयाण राजकीय अंधारात भारतियांना कुठलाही आशेचा किरण उरला नव्हता.

४. कवी कुलभूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कार्याविषयी केलेले वर्णन

अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे एक आशेचा किरण दिसू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महान युगप्रवर्तक कार्य होऊन गेले. यामुळेच आज आपण आपले अस्तित्व टिकवू शकलो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाविषयी कवी कुलभूषण यांनी मार्मिक वर्णन केले आहे. त्यांनी म्हटले, ‘काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती, सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी ।’ या काव्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युगप्रवर्तक कार्याची पूर्वकल्पना येऊन जाते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उदय हा देशासाठी अत्यंत उपायकारक ठरला. ‘त्यांच्या कार्यामुळेच आपले अस्तित्व राहिले आहे’, याची जाण प्रत्येक भारतियाला असलीच पाहिजे. या काव्यातून छत्रपती शिवरायांचे कार्य हे कुण्या एका प्रदेशापुरते नसून त्याचा परिणाम दीर्घकालीन संपूर्ण भारतावर झाला. त्यांचे कार्य हे अत्यंत प्रेरणादायी होते.

संपूर्ण भारतात परकीय आक्रमकांनी घातलेला हैदोस आणि दीर्घकालीन परचक्रामुळे आलेले सामाजिक अन् राजकीय औदासिन्य हे केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांच्या उदयामुळे दूर झाले. महाराजांनी समाजावरील मरगळ दूर करून सर्व समाजामध्ये एक नवीन ऊर्जा चेतवली आणि त्यांनी शत्रूस नामोहरम केले.

५. छत्रपती शिवरायांनी आक्रमकांची चाल ओळखून वापरलेली युद्धनीती 

यापूर्वीचे देशी हिंदू राजे असंस्कृत रानटी आक्रमकांपुढे पराभव पत्करत असत; पण छत्रपती शिवाजी महाराजांनी वरील परिस्थिती अचूक ओळखली होती आणि त्यामुळेच त्यांनी कपटाने चालून आलेल्या अफझलखानास प्रतापगडाच्या पायथ्याशी संपवले. अन्यथा काय घडले असते ? हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. तसेच आवश्यकतेनुसार आदिलशाही सरदार सिद्धी जौहरला तहाचे आमीष दाखवून त्यास झुलवत ठेवले आणि विशाळगडाकडे प्रयाण केले. यातही छत्रपती शिवरायांचा एक महत्त्वपूर्ण राजकीय डावपेच दिसून येतो. तत्कालीन काळाच्या आवश्यकतेनुसार पावले टाकल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूस अगदी नामोहरम केले. शाहिस्तेखानाची लाल महालात त्याच्या निवासस्थानी प्रत्यक्ष जाऊन बोटे छाटणे तेही त्याच्या विशालकाय लष्करास लक्षात न येता असे करणे, हे इतिहासात अद्वितीय आहे.

६. आदिलशाहीवरील स्वारीसाठी छत्रपती शिवरायांनी मोगलांसाठी वापरलेला गनिमी कावा

छत्रपती शिवाजी महाराजांनी अशीच एक चाल करून दक्षिणेतील मोगल सुभेदार बहाद्दूर खानाला बेमालूम चकित केले. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा आदिलशाहीवर स्वारी करावयाची होती, त्या वेळी बहाद्दूर खान हा मोगल सरदार दक्षिण सुभेदार होता. छत्रपती शिवरायांनी आदिलशाहीकडे जातांना ‘मोगलांनी काही आगळीक करू नये आणि ते शांत रहावेत’, या हेतूने मोगल सुभेदार बहाद्दूर खानाशी तह करण्याविषयी कळवले. ‘खुद्द छत्रपती शिवरायांनी तहाची मागणी करणे’, हे बहाद्दूर खानासाठी स्वप्नवत होते; कारण यामुळे त्याचे मोगल दरबारातील वजन वाढणार होते. छत्रपती शिवाजी महाराजांना याची पुरेपूर जाणीव होती की, मोगल राज्यात वरील प्रकारचा तह करण्यास बादशहा औरंगजेबाची संमती आवश्यक असते आणि ती मिळण्यास काही मासांचा अवधी लागणार आहे. या मधल्या कालावधीत मोगल शांत रहाणार, हे महाराजांना ठाऊक होते. अपेक्षेप्रमाणे बहाद्दूर खानाने तहाचा प्रस्ताव औरंगजेबाकडे देहली येथे पाठवला आणि उत्तर येईपर्यंत वाट पहात बसला.

पूर्वनियोजनानुसार छत्रपती शिवरायांनी आदिलशाहीवर स्वारी करून परतल्यावर औरंगजेबाने वरील तह मान्य असल्याचे फर्मान महाराजांकडे पाठवून दिले. स्वाभाविकपणे बहाद्दूर खानाने तह मान्य असल्याविषयी महाराजांना कळवले; पण आदिलशाहीची मोहीम पूर्ण झालेली असल्यामुळे छत्रपती शिवरायांनी तो तह साफ धुडकावून लावला आणि विचारणा केली, ‘‘बहाद्दूर खानाच्या अशा कोणत्या दबावामुळे हा तह करावा ?’’ स्वाभाविकच बहाद्दूर खान आणि मोगल दरबार यांना थप्पड बसल्याप्रमाणे वाटले. असे अद्वितीय चातुर्य शिवकालीन इतिहासात वारंवार सापडते.

७. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठेव्याचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक !

छत्रपती शिवरायांनी गड आणि दुर्ग यांचे महत्त्व अचूकपणे हेरले होते. महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगरांचा लष्करी डावपेचात पुरेपूर उपयोग करून घेतला. ‘गड आणि दुर्ग हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे येणार्‍या कित्येक पिढ्यांसाठी एक अथांग स्फूर्तीचा जिवंत झरा आहेत अन् तो कायम रक्षण केला पाहिजे. त्यामुळे  महाराजांच्या गडांचे संवर्धन झालेच पाहिजे’, असा आग्रह प्रत्येकाने केला पाहिजे. तसेच आपल्या येणार्‍या पिढ्यांना कायम प्रेरणादायी असलेले गड-दुर्ग अतिक्रमण रहित दिसले पाहिजेत. त्यासाठी त्यावर कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे.

– अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती अभ्यासक, परभणी (६.३.२०२३)