पुणे – अंगणवाडीत मदतनीस म्हणून नियुक्तीसाठी दहावी ऐवजी बारावी परीक्षा उत्तीर्ण तसेच मुख्यसेविका म्हणजे पर्यवेक्षक पदभरतीसाठी सेविकेचे कमाल वय ४५ वर्षे अशा अटी प्रशासनाने समाविष्ट केल्या आहेत. याच्या निषेधार्थ अंगणवाडीसेविका ८ मार्च या दिवशी काळे वस्त्र किंवा फीत लावून विभागीय आयुक्त, महिला बाल विकास, सामाजिक न्याय आयुक्त कार्यालय येथे अनवाणी मोर्चा काढून लाक्षणिक उपोषण करणार आहेत. २ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सेविका मदतनीस यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला असून त्यामध्ये या दोन अटी घातल्याने मदतनिसांचा भ्रमनिरास झाला आहे. महिला विकासासाठी स्थापन झालेल्या महिला बालविकास, पुणे विभागीय उपायुक्त कार्यालयासमोर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे लाक्षणिक उपोषण असणार आहे, अशी माहिती ‘अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्र सभे’चे निमंत्रक नितीन पवार यांनी दिली.