मुंबई – गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली असून या मार्गाच्या पहाणी दौर्यानंतर मुंबई-गोवा वन्दे भारत एक्सप्रेस चालू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपच्या आमदारांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी कोकणातील प्रवाशांसाठी पुढील सूत्रे मांडली.
कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्त व्यक्ती अथवा त्यांच्या वारसांना स्टॉल द्यावेत, शेतकर्यांसाठी प्रत्येक स्थानकात फिरता स्टॉल असावा, कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांतील स्थानक आणि गाडी यांमधील उंची समान ठेवावी, रेल्वेपुलामुळे महाड येथे पूरस्थिती निर्माण होत असल्यामुळे उपाययोजना करावी, सावंतवाडी-दिवा ट्रेन दादरपर्यंत न्यावी, रेल्वेमार्गालगत रेल्वेच्या जागेवर वसलेल्या घरांमधील रहिवाशांचे एस्.आर्.ए. प्रकल्पात पुनर्वसन करण्यासाठी रेल्वे जमिनीचा एफ्.एस्.आय. द्यावा, कोकणातील लोटे परशुरामसह विविध एम्.आय.डी.सी. ते रेल्वेस्थानकापर्यंत लाईनसाठी प्रस्ताव सिद्ध करावा, वीर ते रानवाडी स्थानकापर्यंत दुहेरीकरण करावे, जनशताब्दी, तेजस आणि गरीब रथ गाड्यांना खेड रेल्वे स्थानकाचा थांबा द्यावा आदी मागण्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आल्या. त्यावर त्यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.