रत्नागिरी – कर्नाटक राज्यातील खासदारांनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सरकार आणि येथील खासदार यांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नरत असलेल्या कोकण विकास समितीने केली आहे.
समितीने याविषयी म्हटले आहे की,
१. कोकण रेल्वे ही कोकणात चालू होतांना ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर चालू करण्यात आली होती. त्यातील ‘बांधा’ हा टप्पा वर्ष १९९८ ला पूर्ण झाला आणि तेव्हापासून ‘वापरा’ टप्पा चालू आहे. त्यामुळे आता सर्व कोकणवासीय ‘हस्तांतरित करा’ या टप्प्याची वाट पहात आहेत.
२. या मार्गाचे दुपदरीकरण करणे, तसेच स्वतंत्र मालवाहतूक मार्ग यांसाठी आर्थिक प्रावधान (तरतूद) करण्यात आलेले नाही.
३. ‘महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली असून आता विलीनीकरणाच्या दिशेने पावले टाकण्यात येतील’, असे रेल्वेमंत्र्यांनी नमूद केले आहे, तर कर्नाटकातून अशा प्रकारचे प्रयत्न होत असतांना महाराष्ट्रातील खासदारांनीही अशीच भूमिका घेऊन त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.
४. अर्थसंकल्पात स्थान मिळण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे अत्यावश्यक आहे. ते झाल्यास सर्व स्थानकांवर पुरेशा उंचीचे फलाट, फलाटांवरील छत (शेड) आणि पूल, संपूर्ण मार्गाचे दुहेरी, तिहेरी, तसेच चौपदरीकरण करणे; टर्मिनस निर्मिती यांसारख्या पायाभूत सुविधा मिळण्यासाठी वेगळा पाठपुरावा आणि संघर्ष करण्याची आवश्यकता भासणार नाही.
५. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी २ लाख ६२ सहस्र कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी केवळ १ सहस्र ५०० कोटी एवढी तुटपुंजी रक्कम कोकण रेल्वेला मिळाल्याने या सर्व सुविधा प्रवाशांना कधी मिळणार ?, असा प्रश्न आहे.