‘व्‍हिटॅमिन डी’ अल्‍प असल्‍यास औषध घेण्‍यासह काय करावे ?

वैद्य समीर मुकुंद परांजपे

‘सध्‍या अनेक रुग्‍णांच्‍या शरिरात ‘व्‍हिटॅमिन डी’ अल्‍प असल्‍याचे आढळते. आधुनिक शास्‍त्रानुसार ते वाढवण्‍यासाठी कृत्रिमरित्‍या बनवलेली गोळी आठवड्यातून एकदा खाण्‍यासाठी दिली जाते. ‘व्‍हिटॅमिन डी’च्‍या गोळ्‍या घेऊन जरी त्‍याची रक्‍तातील पातळी वाढली, तरी अनेकदा प्रत्‍यक्ष शारीरिक स्‍तरावर त्‍याचे लाभ होतांना दिसून येत नाहीत. औषधाचे शारीरिक घटकांमध्‍ये रूपांतरण (कन्‍व्‍हर्जन) होण्‍यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्‍यकता असतेच !

यासाठी साधा सोपा नैसर्गिक उपाय, म्‍हणजे ‘सकाळच्‍या कोवळ्‍या उन्‍हात शक्‍य तेवढा शरिराचा भाग उघडा ठेवून साधारण ३०-४५ मिनिटे बसणे.’ अनेकांची सकाळच्‍या वेळेत व्‍यस्‍तता असल्‍याने एवढा वेळ उन्‍हात बसणे शक्‍य होत नाही; पण हा वेळ काढणे, म्‍हणजे ‘स्‍वतःच्‍या आरोग्‍यासाठीची केलेली ही वेळेची एका प्रकारची गुंतवणूकच असून ती काळाची आवश्‍यकता आहे’ आणि ती निश्‍चितच फलदायी ठरते.

‘आरोग्‍य हे सूर्यदेवतेकडून प्राप्‍त होते’, असे सुवचन सर्वश्रृत आहे. यामुळे प्रतिकारशक्‍ती, बुद्धी, स्‍मृती आणि ऊर्जा प्राप्‍त होण्‍यासाठी सूर्यकिरणे त्‍वचेवर घेणे आवश्‍यक आहे. आयुर्वेदामध्‍ये याचा उल्लेख सहस्रो वर्षांपासून करून ठेवला आहे. आता आधुनिक संशोधनाच्‍या भाषेत आपण त्‍याला ‘व्‍हिटॅमिन डी’ असे म्‍हणतो.

त्‍यामुळे आमचा समादेश (सल्ला) असा राहील की, किमान आठवड्यातून एकदा किंवा दोनदा, सुट्टीच्‍या दिवशी, जेव्‍हा संधी मिळेल, तेव्‍हा शक्‍य तेवढ्या वेळ सूर्यप्रकाशात बसून नैसर्गिकरित्‍या ‘व्‍हिटॅमिन डी’ मिळवा. यामुळे हाडे आणि स्नायू यांना बळ अन् ऊर्जा मिळून शरीर उत्‍साही होण्‍यासाठी प्रयत्न करा आणि आरोग्‍य सांभाळा.’  (४.१.२०२३)

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (ई-मेल : [email protected])