केरळमधील ‘एशियानेट न्यूज’ वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर केरळ पोलिसांची धाड

  • २ दिवसआधी साम्यवादी विद्यार्थी संघटनेनेही केले होते आक्रमण !

  • केंद्रीय मंत्र्याची वृत्तवाहिनीमध्ये गुंतवणूक असल्याने साम्यवादी सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप !

कोळीकोड (केरळ) – केरळ पोलिसांनी ‘एशियानेट न्यूज’ या वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर धाड टाकून चौकशी केली. यानंतर या वृत्तवाहिनीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याविषयी केरळ विधानसभेत सूत्रही उपस्थित करण्यात आले. अपक्ष आमदार पी.व्ही. अन्वर यांनी या वाहिनीच्या विरोधात विधानसभेत भूमिका मांडली. यावर मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी सांगितले की, या वाहिनीच्या विरोधात तक्रार मिळाल्यानंतर चौकशी चालू करण्यात आली आहे. तसेच गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

१. साम्यवादी विद्यार्थी संघटना ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’च्या (एस्.एफ्.आय.च्या) गुंडांनी या वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर आक्रमण करून तोडफोडही केली होती. आक्रमणाच्या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली होती. त्यानंतर २ दिवसांनी येथे धाड टाकली.

२. या संदर्भात पोलिसांचे म्हणणे आहे की, या वाहिनीवरून अमली पदार्थांच्या विरोधात एक कार्यक्रम सादर करण्यात आला होता. यात अमली पदार्थांचा वाढता प्रभाव आणि अमली पदार्थ माफियांकडून लोकांना फसवणे यांविषयी माहिती देण्यात आली होती. यात एका पीडित मुलीचा चेहरा झाकून तिचा आवाज ऐकवण्यात आला होता. या आवाजामध्ये गडबड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला; मात्र पीडितेच्या वडिलांनी, ‘माझ्या मुलीने सांगितलेली माहिती खरी होती’, असा दुजोरा दिला.

३. राज्यातील सत्ताधारी साम्यवादी आघाडी सरकारचा आरोप आहे की, ‘एशियानेट न्यूज’ वाहिनी केंद्र सरकारच्या आदेशावरून काम करत असून ती राज्य सरकारला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करते.

४. या वाहिनीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुंतवणूक केलेली आहे. ‘एशियानेट न्यूज नेटवर्क’चे कार्यकारी अध्यक्ष राजीव कालरा यांनी पोलिसांनी प्रविष्ट केलेल्या गुन्ह्याला खोटे ठरवलले असून ‘याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.

संपादकीय भूमिका 

बीबीसीच्या कार्यालयांचे आयकर विभागाने सर्वेक्षण केल्यावर थयथयाट करणारे ‘एशियानेट’विषयी गप्प आहेत. यातून त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येते !