इराणमध्ये पालकांनी सरकारच्या विरोधात केली आंदोलने !

इराणमधील ९०० हून अधिक विद्यार्थिनींना विष दिल्याचे प्रकरण

तेहरान (इराण) – इराणमध्ये शालेय शिक्षण घेणार्‍या ९०० हून अधिक विद्यार्थिनींना विष दिल्याचे प्रकरण अधिक जटील होत चालले आहे. देशात काही ठिकाणी या प्रकरणी विद्यार्थिनींच्या पालकांनी आंदोलने केली. या वेळी त्यांनी ‘विषबाधा करणारे  इस्लामिक स्टेटप्रमाणे आहेत’, असे म्हटले. याआधी ३ मार्च या दिवशी इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी दावा केला होता की, विष देण्याचे काम इराणच्या शत्रूराष्ट्रांनी केले असून या माध्यमातून देशात भय आणि असुरिक्षतता यांचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. इराणच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

१. विषबाधेमागे देशातील इस्लामी कट्टरतावाद्यांचा हात असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

२. एका वरिष्ठ मौलवीने (इस्लामच्या धार्मिक नेत्याने ) म्हटले की, सरकारच्या वक्तव्यांमुळे लोकांमध्ये सरकारविषयीची विश्‍वासार्हता संपुष्टात आली आहे. यामुळे लोकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

३. जिनेवा येथे नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकारांच्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी इराणच्या शिक्षण उपमंत्र्यांनी हे स्वीकारले होते की, मुलींना शाळेत जाण्यापासून रोखण्यासाठी असे करण्यात आले होते. यानंतर त्यांनी त्यांचे विधान मागे घेतले होते.

४. विद्यार्थिनींना विष दिल्याचे प्रकरण प्रथम गेल्यावर्षी ३० नोव्हेंबर या दिवशी समोर आले, जेव्हा येथील कोम शहरातील ५० हून अधिक विद्यार्थिनींना विषबाधा झाली होती. त्यांच्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. ‘रॉयटर्स’ या जागतिक वृत्तसंस्थेनुसार देशातील ३१ पैकी १० प्रांतातील ३० शाळांतील विद्यार्थिनींना विष देण्यात आले होते.