१. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचा जागतिक पातळीवर दबदबा !
‘सध्या जगात एका भारतियाने भीती माजवली आहे. काही लगेच मोदी, पुतिन, जो बायडेन, किम जोंग उन, शी जिनपिंग यांच्यापैकी एकाचे नाव घेतील, तर काही अमित शहा किंवा राहुल गांधी यांचेही नाव घ्यायला मागे पहाणार नाहीत; परंतु हे नाव वेगळेच आहे. या नावाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, तरीही भलेभले या माणसाला सामोरे जायला घाबरायला लागले आहेत. महाराष्ट्रात एक राज ठाकरे आहेत की, ज्यांना प्रश्न विचारायला पत्रकारही घाबरतात; परंतु त्याचे कारण काही एवढे विशेष नाही. येथे मी ज्या नावाविषयी सांगणार आहे, त्या नावाची भीती जगाला आणि भारतियांना अभिमान करायला लावणारी आहे. काल परवापर्यंत हा ‘भारतीय विदेश सेवे’तील (आय.एफ्.एस्.) अधिकारी धारिका हातात घेऊन राजकीय नेत्यांच्या मागेपुढे पळत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिकार्याला हेरून निवृत्त होताच थेट भारताचा परराष्ट्रमंत्री आणि राज्यसभेत खासदार केले. हो अगदी बरोबर, डॉ. एस्. जयशंकर ! यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत जागतिक पातळीवर सगळ्याच देशांना भारतियांची शक्ती दाखवून दिली.
शस्त्रास्त्रांच्या जोरावर दहशत पसरवणारे भरपूर पाहिले; परंतु एखादा हजरजबाबी परराष्ट्रमंत्री भारताला मिळणे आणि केवळ हुशारीवर अशा व्यक्तीला पद देणे, हे कदाचित् स्वातंत्र्यानंतर क्वचित्च घडले असेल. वर्ष २०१४-२०१५ नंतर डॉ. एस्. जयशंकर, अश्विन वैष्णव, हरदीपसिंह पुरी, अजित डोवाल, पी.के. मिश्रा आणि असे अनुमाने २०० भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय विदेश सेवा यांतील अधिकारी विविध ठिकाणी रितसर काम करत आहेत. विशेष म्हणजे ते जे काम करत आहेत, त्याचे सध्या चांगले परिणाम दिसत आहेत आणि दिसणार आहेत. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे पाकव्याप्त काश्मीरच्या रूपाने भळभळणारी जखम हीच मंडळी युद्ध न करता भरून काढणार आहेत. मोदी यांनी बरोबर म्हटले आहे, ‘‘सध्याच्या काळात युद्ध करणे परवडणारे नाही; परंतु युद्ध न करता युद्धाहूनही वाईट वेळ एखाद्या किंवा ठरवलेल्या लक्ष्यावर आणता येऊ शकते.’’ याचे जिवंत उदाहरण आपण पाकिस्तानच्या रूपात पहातच आहोत. आपल्याला भारताने नष्ट केले आहे, हे पाकिस्तानलाही समजले नाही आणि समजून ते जगाला सांगूही शकत नाही. भलेही ते जगालाही ठाऊक आहे; परंतु असा बेमालूम काटा काढला आहे. खरी गंमत यापुढे चालू होणार आहे.
२. पाकिस्तान यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर !
आपण पाकिस्तानातील जे बलुचिस्तान बघतो, त्याला जिनाने स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले होते; परंतु तेथेही काश्मीरप्रमाणे माणसे घुसवून कब्जा मिळवला. बलुचिस्तानला जेमतेम ८ दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवता आले. काही का असेना एकदा स्वातंत्र्य अनुभवलेल्या बलुचिस्तानला नंतर स्वातंत्र्य मिळवण्याचा ध्यासच लागला आहे. बलुची लोक केवळ बलुचिस्तानमध्येच नाहीत, तर इराण आणि अफगाणिस्तान या देशांतही आहेत. तसाच विषय पख्तून प्रांताचा आहे. पाकिस्तानप्रमाणेच अफगाणिस्तानमध्येही पख्तूनी लोक आहेत. स्वातंत्र्यापूर्वी रशियायी आक्रमणाला थोपवण्यासाठी इंग्रजांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ‘ड्युरंड रेषे’ची (अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा) निर्मिती केली. या रेषेने असा घोटाळा केला की, अर्धा पख्तून अफगाणिस्तानात आणि अर्धा पाकिस्तानात गेला आहे.
सरहद गांधी किंवा सरदार खान अब्दुल गफार खान आठवतात का? हे तेच ज्यांनी इंग्रजांविरुध्द स्वातंत्र्य आंदोलने केली होती. तर या सरहद गांधींनी जिनांच्या ‘द्विराष्ट्र थेअरी’ला विरोध केला होता. पख्तून प्रांत भारतात समाविष्ट करावा, असे सरहद गांधींना वाटत होते. ते शक्य होऊ शकले नाही, तर वेगळ्या पख्तून देशाची निर्मिती त्यांना मान्य होती; परंतु जिनांनी तसे काहीच होऊ दिले नाही. तसेही फाळणीसंदर्भात झालेल्या मतदानात जवळपास १०० टक्के फाळणीच्या बाजूने मतदान झाले होते; परंतु मुसलमानांनी पाकिस्तानऐवजी भारतातच रहाणे मान्य केले. याचा अर्थ फाळणीचे हे गौडबंगाल थोड्या लोकांचे लाड पुरवण्यासाठी केल्यासारखे झाले. या फाळणीची किंमत दोन्ही देशांना आणि त्यांच्या नागरिकांना जीवित हानी अन् मालमत्ता यांच्या रूपाने मोठ्या प्रमाणात मोजावी लागली. वर्ष १९४७ पासून पाकिस्तानमध्ये कधीही लोकशाही नांदू शकली नाही. कुंपणानेच शेत खाल्ले आहे आणि आता लवकरच पाकिस्तानात यादवी किंवा नागरी युद्ध माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
३. पाकिस्तानला वाचवण्यात चीन आणि मुसलमान राष्ट्रे असमर्थ
तालिबानी आतंकवाद्यांना स्वत:च्या भूमीचा वापर करू दिलेल्या पाकिस्तानने बराच पैसा आणि इतर गोष्टी यांच्या मोबदल्यात आतंकवाद पोसला. ही मंडळी आपल्याला भविष्यात उपयोगी पडतील, अशी पाकिस्तानी नेतृत्वाची दूरदृष्टी होती. आता त्याची फळे त्यांना भोगावी लागत आहेत. कोणत्याही देशासाठी त्याचे परराष्ट्र धोरण आणि गुप्तहेर यंत्रणा महत्त्वाची असते. वर्षानुवर्षे सावज टप्प्यात येण्याची वाट बघत बसायची आणि ते टप्प्यात आल्यावर कचखाऊ वृत्ती वापरायची. याने साधनसामग्रीची हानी होते, तसेच प्रश्न अधिक जटील बनतात. जगात नाचक्की होते, ती तर वेगळीच. आता तसे राहिलेले नाही. काही गोष्टी घडल्या आहेत, काही गोष्टी घडवल्या जात आहेत आणि काही गोष्टी घडवायच्या आहेत. जसजशी वेळ पुढे सरकेल, तसतसा पाकिस्तान अशांत होईल. तालिबान हा पाकिस्तानचे एखाद्या शिकारी कुत्र्याप्रमाणे लचके तोडण्यास प्रारंभ करील. सध्या संपूर्ण पाकिस्तानात पाकिस्ताननेच पोसलेला आतंकवाद बाँबस्फोट घडवत आहे. आर्थिक परिस्थिती बेजार झालेल्या पाकिस्तानला तालिबानशी लढण्यासाठी लागणारा पैसा उभे करणे अशक्य होणार आहे. अशा परिस्थितीतही काही देश पाकिस्तानचे साहाय्य करायचे सोंग निश्चित करणार आहेत. काही देश, म्हणजे मुसलमान समाजाचा नवा मसिहा अशी प्रतिमा रंगवणारा तुर्कीये आणि चीन. काही कारणांनी पाकिस्तानात केलेली गुंतवणूक फसल्यामुळे चिनी नेतृत्व चिंतेत आहे. रहाता राहिला प्रश्न अरब देशांचा, तर खनिज तेलाच्या जिवावर जगणार्या या देशांनी सध्या पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था उभारत असल्याचे दाखवत आहेत. मुळात आणखी ३०-४० वर्षांनी या देशांमध्ये पर्यटनाला कोण जाणार आहे ? हा मोठा प्रश्न आहे.
४. भारताचा मुत्सद्दीपणा चीनसाठी आव्हान
प्रत्यक्षात अरबी तरी तिथे रहाणार आहेत का? आज त्यांची विकसनशील किंवा विकसित देशांमध्ये गुंतवणूक करण्याची निरंतर धडपड लपून राहिलेली नाही. गुंतवणूक करण्यासाठी त्यांचा भारताला अग्रक्रम आहे. त्यातच रशिया-युक्रेन युद्धानंतर भारताने रशियाची बाजू उचलून धरल्यामुळे भारत आणि रशिया आणखी जवळ आले आहेत. तसे तर चीननेही रशियाची बाजू घेतली; परंतु रशियाच्या दृष्टीने भारतच महत्त्वाचा आहे; कारण चीन हा आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटा पडलेला आहे आणि भारताच्या सहभागाविना जगातील महत्त्वाचे देश कोणताच महत्त्वपूर्ण निर्णय घेत नाहीत. रशियाचे भारतासमवेतचे संबंध नेहमीच चीनहून अधिक चांगले रहाणार आहेत. अशा वेळी रशिया आणि भारत व्यापारी संबंध वाढणे साहजिकच आहे. त्यापैकीच एक म्हणजे पाईपलाईनच्या माध्यमातून भारताला गॅस आणि खनिज तेल यांचा पुरवठा करणे. भारत, रशिया, पाकिस्तान आणि चीन या चारही देशांचा ‘क्रॉस पॉईंट’ नेमका पाकव्याप्त काश्मीर येतो. येथे भारताला शह दिला, तरी चीनच्या काशगरपासून ग्वादर बंदरापर्यंत पोचण्यासाठी बलुचिस्तानखेरीज पर्याय नाही आणि सध्या तरी बलुचिस्तानमधे भारताचीच चलती आहे. ही गोष्ट भारतियांना ठाऊक नसली, तरी चिन्यांना चांगलीच ठाऊक आहे.
५. भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान यांच्यावर ताबा मिळवल्यास देशद्रोही टोळी देशात अस्थिरता निर्माण करण्याची शक्यता !
दुसर्या बाजूला तालिबान पख्तूनमध्ये करत असलेल्या कारवायांनी गिलगिट बाल्टिस्तान आपसूकच बाजूला पडणार आहे. मग तेथे आंदोलने चालू होतील आणि मग बिनबोभाट भारत पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान यांच्यावर ताबा मिळवेल. विशेष म्हणजे हे सर्व होत असतांना चीनला निमूटपणे गप्प बसावे लागणार आहे; कारण बीजिंगहून ग्वादर बंदरात पोचण्यासाठी भारताचाच आसरा घ्यावा लागणार आहे.
वास्तविक पाकव्याप्त काश्मीरचे एवढे अवघड बनवलेले गणित एवढ्या सोप्या पद्धतीने सुटल्यावर कलम ३७० सारखेच (जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम) भारतात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. या लोकांना चीनच्या खाल्लेल्या मिठाला जागावे लागेल ना ? कारण भारतात कुठल्या ना कुठल्या कारणाने अस्थिरता निर्माण करण्याचा एक ‘लाँग टर्म अजेंडा’ (प्रदीर्घ कालावधीचा कार्यक्रम) आहेच ना !
६. पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान कह्यात घेण्याची हीच ती वेळ !
अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळाल्यानंतर तालिबान्यांना आकाश ठेंगणे झाले आहे. त्यामुळे बलूच आणि पख्तून प्रांताला स्वतंत्र करण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेने उचल खाल्ली आहे. पाकिस्तान सध्या राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर झाला आहे. तसेच परिस्थिती कधीही हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारताच्या अजेंड्याप्रमाणे पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्यासाठी वेळ अनुकूल होत आली आहे. त्यासाठी भारतात जनमत चेतवण्याचे काम चालू आहे. ‘भारत कधीही पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेऊ शकतो’, असे वातावरण निर्माण करणे चालू आहे. ज्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर जो प्रभाव पाडणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे काम चालले आहे.गिलगिट बाल्टिस्तानमधे पाकिस्तान आणि चीन यांच्या विरोधात जनआंदोलन करून वातावरण अस्थिर बनवण्यास प्रारंभ झाला आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानमधील नेते अन् विचारवंत यांच्याशी वार्तालाप करून हा भाग आणि त्या भागातील लोक भारतात सहभागी होण्यास सिद्ध आहेत, हे दाखवण्याचाही कार्यक्रम चालू आहे. एकंदरीत अनुकूल वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. हा भारताची परराष्ट्रविषयक कूटनीती आणि मुत्सद्देगिरी यांचाच एक भाग आहे. एकंदरीत पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान भारताने परत मिळवल्याची गोड बातमी येणार्या काळात लवकरच पूर्ण होईल, ही आशा करूया.’
– श्री. सचिन ढोक, पुणे. (साभार : सामाजिक संकेतस्थळ)