थकबाकीदारांच्या नावांचे फलक चिपळूण शहरात झळकणार !

चिपळूण – मार्च मासाच्या शेवटपर्यंत जे थकबाकीदार त्यांच्या कराची रक्कम नगरपालिकेकडे भरणार नाहीत, त्यांची नावे चिपळूण शहरात लावण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. ही कारवाई ७ मार्चपासून केली जाणार असून तशी नोटीस संबंधितांना पाठवण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष संपत असल्याने नगरपालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचा वेग आणखी वाढवला आहे. त्यामुळे थकबाकीदार असलेल्या अनेकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून १०५ जणांची नळजोडणी तोडण्यात आली आहेत. त्यातील २७ जणांनी कर भरल्याने त्यांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. जे नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांची नळजोडणी तोडली जात आहे. पाणीपट्टीतून नगरपालिकेला २ कोटी ५० लाख रुपये मिळणे अपेक्षित असून त्यातील केवळ ९७ लाख रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे नळजोडणी तोडण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.