पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आमलकी एकादशीच्या निमित्ताने येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात १ टन द्राक्षांची सजावट करण्यात आली होती. त्यानंतर केवळ २ घंट्यांतच द्राक्षांची सजावट मंदिरातून गायब झाल्याचे समोर आले. ही द्राक्षे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नेल्याचे मंदिर समितीचे म्हणणे आहे, तर काही भाविकांनी मंदिरातील कर्मचार्यांनीच द्राक्षे नेल्याचा आरोप केला आहे. या प्रकारामुळे नेमकी द्राक्षे कुणी नेली ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संपर्क केला असता त्यांनी भ्रमणभाष उचलला नाही. (मंदिरातील द्राक्षांच्या संदर्भात अशी स्थिती असेल, तर मंदिरात अर्पण स्वरूपात येणारे धन किती सुरक्षित रहात असेल ? असा प्रश्न भाविकांना पडल्यास चूक ते काय ? या उदाहरणावरून मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम लक्षात येतात. – संपादक)