वर्ष २००५ मधील वास्को येथील डॉ. श्रीकांत वेरेकर यांच्या हत्येचे प्रकरण
पणजी, २ मार्च (वार्ता.) – वर्ष २००५ मध्ये वास्को येथील डॉ. श्रीकांत वेरेकर यांची हत्या केल्याच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा डॉ. श्रीकांत वेरेकर यांचा जावई रायन फर्नांडिस याची १४ वर्षांनंतर कारागृहातून सुटका होणार आहे. सासर्याच्या हत्येच्या प्रकरणी तो कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याने सुटकेसाठी अर्ज केला होता. गृह खात्याच्या पूर्वसुटका समितीने रायन फर्नांडिस याचा अर्ज फेटाळला होता. गृह खात्याच्या पूर्वसुटका समितीच्या या निर्णयाला रायन फर्नांडिस याने सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले होते. रायन फर्नांडिस याची पूर्वसुटका केल्यास त्याचे कुटुंब त्याला स्वीकारण्यास सिद्ध असल्याचे पोलिसांनी सर्वाेच्च न्यायालयाला सांगितल्यावर त्या आधारे २ मार्च या दिवशी हा निवाडा देण्यात आला आहे.
Goa Crime News : डॉ. श्रीकांत वेरेकर हत्या प्रकरण; लव्ह ट्रॅप, सूड, खून, फाशी, जन्मठेप आणि सुटकेची कहाणी#Goanews #Goapolice #Crime #Vasco #Murder #SupremeCourt #Marathinews #Dainikgomantak https://t.co/yIplhbPEA1
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) March 3, 2023
रायन फर्नांडिस याने डॉ. श्रीकांत वेरेकर यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत असलेल्या मुलीशी नोंदणी विवाह केला होता; पण हा विवाह अपयशी ठरला. यानंतर १७ जानेवारी २००५ या दिवशी डॉ. श्रीकांत वेरेकर हे सकाळी चालत असतांना रायन फर्नांडिस आणि त्याचे साथीदार यांनी त्यांचे मांगोरहील, वास्को येथून अपहरण केले. दोन दिवसांनंतर डॉ. श्रीकांत वेरेकर यांचा मृतदेह कासावली येथे एका निर्जनस्थळी आढळला होता. या प्रकरणी रायन याला वर्ष २००७ मध्ये मडगाव सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती आणि वर्ष २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेमध्ये केले होते. १४ वर्षे शिक्षा भोगलेल्या आरोपींच्या वर्तवणुकीवरून त्यांच्या पूर्वसुटकेसाठी गृह खात्याकडे सूची पाठवली जाते आणि त्यावर पूर्वसुटका समिती निर्णय घेत असते.