व्‍यापार्‍यांवर अन्‍याय होऊ न देता श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा ! – राजेश क्षीरसागर, अध्‍यक्ष, राज्‍य नियोजन मंडळ

जिल्‍हाधिकारी कार्यालयात बैठक घेतांना राजेश क्षीरसागर

कोल्‍हापूर – श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील विकासकामांचे नियोजन करतांना शासकीय, निमशासकीय, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या जागांचा प्राधान्‍याने विचार करावा. स्‍थानिक नागरिक आणि व्‍यापारी यांच्‍यावर अन्‍याय होणार नाही, याची दक्षता घेऊन कामांचे नियोजन करा, अशा सूचना राज्‍य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्‍यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्‍या. पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान समितीच्‍या विविध प्रश्‍नांबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयात कार्यकारी अध्‍यक्ष राजेश क्षीरसागर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक घेण्‍यात आली. त्‍या वेळी या सूचना त्‍यांनी केल्‍या.

या प्रसंगी अपर जिल्‍हाधिकारी संजय शिंदे, विशेष भूसंपादन अधिकारी शक्‍ती कदम, देवस्‍थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, स्‍थानिक नागरिक आणि व्‍यापारी यांचे प्रतिनिधी उपस्‍थित होते.

राजेश क्षीरसागर पुढे म्‍हणाले, ‘‘तिरुपती, श्री सिद्धिविनायक, शिर्डी या देवस्‍थानांच्‍या धर्तीवर श्री महालक्ष्मी मंदिराच्‍या परिसराचा विकास व्‍हावा; मात्र हा विकास साधतांना स्‍थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, त्‍यांच्‍यामध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊनच कामांचे नियोजन करावे.’’ या प्रसंगी अपर जिल्‍हाधिकारी संजय शिंदे म्‍हणाले, ‘‘श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात धार्मिक कार्य, भाविकांसाठी पिण्‍याचे पाणी, अन्‍नछत्र, निवास व्‍यवस्‍था, स्‍वच्‍छतागृह, माहिती केंद्र आदी सेवा सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी नियोजन करण्‍यात येत आहे.’’