पुणे – गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल २ मार्च या दिवशी लागला. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत ११ सहस्रांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा ७३ सहस्र १९४ मतांनी विजय झाला, तर हेमंत रासने यांना ६२ सहस्र २४४ मते मिळाली आहेत. गेल्या २८ वर्षांपासून भाजपच्या हातात असलेला हा मतदारसंघ आता मविआने कह्यात घेतला आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे पराभूत झाले आहेत. या निवडणुकीमध्ये २८ उमेदवार रिंगणात होते. अश्विनी जगताप यांचा ३५ सहस्रांंहून अधिक मतांनी विजय झाला आहे. यानंतर अश्विनी जगताप म्हणाल्या, ‘‘मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठीशी उभे राहिल्याविषयी धन्यवाद देते. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामे आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.’’