‘सामूहिक कॉपी’स साहाय्‍य करणार्‍या परीक्षा केंद्र संचालकांसह ९ शिक्षकांवर गुन्‍हा नोंद !

दौंड (पुणे) येथे इयत्ता १२ वीच्‍या परीक्षेतील अपप्रकार

पुणे – केडगाव (तालुका दौंड) येथे इयत्ता १२ वी बोर्डाच्‍या परीक्षा केंद्रामध्‍ये ‘सामूहिक कॉपी’ (नक्‍कल) करण्‍यास विद्यार्थ्‍यांना साहाय्‍य केल्‍याप्रकरणी परीक्षा केंद्र संचालकांसह ९ शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. २७ फेब्रुवारी या दिवशी पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या ‘भरारी पथका’ने केडगाव येथील जवाहर विद्यालयातील बारावीच्‍या परीक्षा केंद्राला भेट दिल्‍यावर लक्षात आले. विद्यार्थ्‍यांना सामूहिक कॉपी करण्‍यास प्रतिबंध न करता, त्‍यांची अंगझडती न घेता, त्‍यांना कॉपी करण्‍यासाठी उत्तेजन देऊन अप्रत्‍यक्ष साहाय्‍य केले आहे. या प्रकरणी ‘भरारी पथका’चे प्रमुख आणि विस्‍तार अधिकारी किसन भुजबळ यांनी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • विद्यार्थ्‍यांवर संस्‍कार करणे दूरच, उलट त्‍यांना कॉपी करण्‍यास साहाय्‍य करणारे शिक्षक म्‍हणजे शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड !
  • असे शिक्षक विद्यार्थ्‍यांवर काय संस्‍कार करणार ? असे शिक्षक आणि विद्यार्थी यांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !