(म्हणे) काश्मीरमधून आतंकवाद नष्ट झाल्याचे सरकार सांगत असेल, तर शर्मा यांना कुणी मारले ?-मेहबूबा मुफ्ती

काश्मिरी हिंदूची हत्या केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांचे नक्राश्रू !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपीच्या) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदु संजय शर्मा यांची आतंकवाद्यांनी हत्या केल्यानंतर दुःख व्यक्त करत ‘शर्मा यांच्या हत्येविषयी काश्मिरी मुसलमानांना लाज वाटत आहे. केंद्र सरकार आतंकवाद संपुष्टात आल्याचा दावा करत आहे. असे आहे, तर शर्मा यांना कुणी मारले ? सरकार काय करत आहे ?, असे प्रश्‍न विचारले. ‘सरकारने शर्मा यांच्या पत्नीला नोकरी दिली पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी केली.

मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, आम्ही तेच लोक आहोत, ज्यांनी वर्ष १९४७ मध्ये काश्मीरमध्ये रहाणारे हिंदु आणि शीख यांच्या रक्षणासाठी सर्व काही केले होते. त्या वेळी भारतात धार्मिक दंगली चालू होत्या. आज काश्मिरी मुसलमान हतबल आहेत. ते फसलेले आहेत. एकीकडे सरकारची बळजोरी, तर दुसरीकडे आतंकवाद नष्ट करण्याच्या नावाखाली सहस्रो युवकांना कारागृहात टाकण्यात आले आहे. लोकांच्या घरांना टाळे ठोकण्यात येत आहे. धाडी घातल्या जात आहेत.


(जिहादी आतंकवाद्याला ठार केल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जाणार्‍या सहस्रो लोकांविषयी मेहबूबा मुफ्ती का बोलत नाहीत ? सैन्याकडून चकमक होतांना आतंकवाद्यांच्या समर्थनासाठी सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांविषयी त्या का बोलत नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका

याचे उत्तर सरकारने दिलेच पाहिजे; मात्र या प्रश्‍नाच्या नावाखाली काश्मिरी हिंदूंविषयी काळजी असल्याचे दाखवणार्‍या ढोंगी मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यात त्यांचे सरकार असतांना काय दिवे लावले, हेही सांगायला हवे ! दगडफेक करणार्‍या सहस्रो लोकांवरील गुन्हे का मागे घेतले, हेही सांगायला हवे !