राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी मलनि:स्सारण प्रक्रिया चालू करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्यातील नद्यांमध्ये प्रक्रिया न करता नाल्याचे पाणी सोडले जात आहे. यापुढे प्रकिया केल्याविना नाल्याचे पाणी नद्यांमध्ये सोडता येणार नाही. राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी मलनि:स्सारण प्रक्रिया चालू करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत दिली.

१. भिवंडी (जिल्हा ठाणे) येथील कामवरी नदीमध्ये जलपर्णी वाढल्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित झाले असल्याविषयी आमदार रईस शेख यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
२. या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नद्यांमध्ये नाल्यांचे पाणी सोडल्यामुळे राज्यातील नद्या प्रदूषित होत असल्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.
३. त्याविषयी माहिती देतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, कामवरी नदीतील जलपर्णी जेसीपी आणि पोकलेन यांच्या साहाय्याने काढण्याची सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. हर्बलची फवारणी केल्यानंतर काही ठिकाणी जलपर्णी नष्ट झाली आहे. या प्रयोग यशस्वी झाल्यामुळे नगरविकास विभागाकडून जलपर्णी नष्ट करण्यासाठी काम करण्यात येईल.

नाल्याचे पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी बांधकाम, तसेच अन्य उद्योगांसाठी करावे, असा आदेश औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात आला आहे. पाण्याचा पुनर्वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे ‘भविष्यात नद्यांचे प्रदूषण अल्प होईल’, असे सांगितले.