देवरुख (रत्नागिरी) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवरुखवासियांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे एकत्र येऊन त्यांना अभिवादन केले. या वेळी नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, नगरसेविका प्रतीक्षा वणकुद्रे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अण्णा शहाणे, अनिल साळवी, युयुत्सु आर्ते, हेमंत तांबे, अमोल प्रभुघाटे आदींसह व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते. स्वातंत्रवीर सावरकरांच्या प्रतिमेचे अण्णा शहाणे आणि हेमंत तांबे यांनी पूजन केले. या वेळी युयुत्सु आर्ते यांनी ‘स्वातंत्र्यकाळातील सावरकरांचे कार्य महान आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील सावरकर यांनी केलेली कामगिरी पहाता त्यांना सरकारने ‘भारतरत्न’ घोषित करावे’, अशी मागणी देवरुखवासियांच्या वतीने केली.
या मागणीसाठी स्वाक्षर्यांचे निवेदन शासनापर्यंत पोचवण्यासह प्रसंगी याच चौकात आंदोलन करण्याची सिद्धताही उपस्थितांनी दर्शवली. या वेळी नगराध्यक्षा सौ. शेट्ये यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाईल’, असे आश्वासन दिले.