देशभरात एकूण ३११ नदीपट्ट्यांमध्‍ये धोकादायक प्रदूषण !

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा(‘सीपीसीबी’)चा अहवाल

प्रतिकात्मक छायाचित्र

चिपळूण – देशभरातील ३११ नद्यांतील काही पट्ट्यांमध्‍ये प्रदूषण हे धोक्‍याच्‍या पातळीवर असल्‍याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्‍ये महाराष्‍ट्रातील ५५ नद्यांचा समावेश आहे. यामध्‍ये वाशिष्‍ठी, सावित्री आणि मुचकुंदी हे जिल्‍ह्यातील ३ नदीपट्टे प्रदूषित असल्‍याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या (सीपीसीबी) अहवालातून स्‍पष्‍ट झाले आहे.

या अहवालात देशातील ६०३ नद्यांचे परिक्षण करण्‍यात आले होते.  मध्‍यप्रदेशमध्‍ये १९, बिहार आणि केरळमध्‍ये १८, कर्नाटक आणि उत्तरप्रदेशमध्‍ये १७ आणि महाराष्‍ट्रात ५५ नद्यांचा यात समावेश आहे.

राज्‍यातील भीमा, मिठी, मुठा, सावित्री, गोदावरी, कन्‍हान, मुळा, पवना, इंद्रायणी, अंबा, अमरावती, बोरी, बुराई, भातसा, बिंदुसरा, चंद्रभागा, दारणा, घोड, गोमाई, गिरणा, हिवरा, कलू, कन, कोलार, कोयना, कृष्‍णा, कुंडलिका, मंजिरा, मोर, मोरणा, मुचकुंदी, मोरणा, नीरा, पांझरा, पाताळगंगा, पैनगंगा, पेढी, पेहलर, पूर्णा, रंगावली, सीना, सूर्या, तानसा, तापी, तितूर, उल्‍हास, उरमोडी, वैतरणा, वाशिष्‍ठी, वेण्‍णा, वाघूर, वैनगंगा, वर्धा, वेणा या नद्यांतील काही भाग प्रदूषित झाल्‍याचे अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

शहरे आणि उद्योगांमधील सांडपाणी नदीत सोडले जाते. यातील रासायनिक घटक, तसेच इतर टाकाऊ वस्‍तूंमुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते. पर्यायाने त्‍या भागातील नदीच्‍या परिसंस्‍था धोक्‍यात येतात. त्‍याचा दुष्‍परिणाम निसर्ग आणि मानवी आरोग्‍य यांवर होत आहे. यामध्‍ये वाशिष्‍ठी नदीतील दळवटणे ते खेर्डी, तर सावित्री नदीतील दादली ते मुठावली हा पट्टा प्रदूषित नदीपट्‌ट्यांमध्‍ये समाविष्‍ट आहे.

संपादकीय भूमिका

नदीपट्ट्यांमध्‍ये होणारे धोकादायक प्रदूषण रोखून नद्यांचे जतन करणे, हे प्रत्‍येक नागरिकाचे कर्तव्‍य आहे !