श्री काशी विश्‍वनाथाच्या मंगल आरतीच्या शुल्कात वाढ !

भाविकांना आता मोजावे लागणार ५०० रुपये !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या श्री काशी विश्‍वनाथाच्या मंगल आरतीच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय २२ फेब्रुवारीला झालेल्या ‘श्री काशी विश्‍वनाथ मंदिर ट्रस्ट’च्या १०४ व्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मंदिर न्यासाचे अध्यक्ष प्रा. नागेंद्र पांडे, मंडल आयुक्त कौशल राज शर्मा, सरकारी अधिकारी राजलिंगम् उपस्थित होते.

पहाटे ३ ते ४ या वेळेत होणार्‍या या मंगल आरतीसाठी आता भाविकांना ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हे शल्क ३५० रुपये इतके होते. यासह सप्तर्षि आरती, शृंगार प्रसाद आरती आणि मध्यान्ह प्रसाद आरतीच्या शुल्कांतही १२० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या आरतींसाठी आता एकूण १८० रुपयांऐवजी ३०० रुपये मोजावे लागणार आहेत. ही शुल्कवाढ १ मार्चपासून लागू होणार आहे. ही शुल्कवाढ ५ वर्षांनी करण्यात आली आहे. यापूर्वी वर्ष २०१८ मध्ये शुल्कवाढ करण्यात आली होती. विश्‍वस्त मंडळाने सांगितले की, मंदिरातील भाविकांची गर्दी पाहता शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

रुद्राभिषेक आणि प्रसाद यांच्या शुल्कात वाढ नाही !

मंदिराचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनीलकुमार वर्मा यांनी सांगितले की, केवळ आरतींच्या शुल्कांत वाढ करण्यात आली आहे. रुद्राभिषेक आणि प्रसाद यांच्या शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मंदिराला यंदा, म्हणजे वर्ष २०२२-२३ मध्ये १०५ कोटी रुपयांचे दान मिळाले. यंदाचा संभाव्य व्यय (खर्च) ४० कोटी रुपये इतका आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘देव धनाचा नाही, तर भावाचा भुकेला आहे’, हे व्यवस्थापन मंडळाला कोण सांगणार ?
  • मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यावरून ‘सरकारी विश्‍वस्तांचा केवळ मंदिराच्या पैशांवरच नाही, तर भाविकांच्या पैशांवरही डोळा असतो’, असे कुणाला वाटल्यास चूूक ते काय ?