चि. वेदांशी भोसले या ३ वर्षीय चिमुकलीने विदेशात राहून मराठी मातीतील संस्कार न विसरता छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा खड्या आवाजात गाऊन सर्वांसमोर शौर्याचा आदर्श ठेवला आहे. सर्वांत लहान वयात छत्रपती शिवरायांच्या शौर्यकथा सांगणारी आणि पोवाडा गाणारी म्हणून तिची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. चि. वेदांशी ही सध्या आई-वडिलांसमवेत डेन्मार्क येथील ओडेन्स शहरात रहाते. मूळचे पुणे येथील असलेल्या भोसले दांपत्याने चि. वेदांशीला पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यकथा शिकवल्या आहेत. आपल्या मुलीला पाश्चात्त्य विचारसरणीच्या आहारी न घालवता छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवण्यासाठी उद्युक्त केले आहे. केवळ स्वतःपुरता विचार न करता विदेशातही छत्रपती शिवरायांची कीर्ती कशी पोचेल, असाच प्रयत्न भोसले दांपत्यांनी केला आहे. त्यांचा हा प्रयत्न ‘रिअॅलिटी शो’मध्ये अश्लील गाण्यांवर नृत्य करण्यासाठी पाठवणार्या पालकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे.
(सौजन्य : Loksatta)
चि. वेदांशी ही २ वर्षांची असल्यापासून मराठी कविता, श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हणते. याविषयी तिचे वडील श्री. संतोष भोसले म्हणाले, ‘‘विदेशात वडीलधार्या मंडळींच्या अनुपस्थितीत तिला आपले भारतीय संस्कार कसे देता येतील, याचा प्रयत्न आम्ही करतो. भारताची संस्कृती जगात सर्वांत वेगळी आणि उल्लेखनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज अनेकांना फक्त माहिती आहेत; मात्र त्यांच्या शौर्यकथा आपण आपल्या मुलांना सांगितल्या पाहिजेत. त्यांना लहान वयातच छत्रपती शिवरायांची ओळख करून दिली पाहिजे.’’ तिची आई सौ. प्रीती भोसले म्हणाल्या, ‘‘मी चि. वेदांशीला प्रतिदिन मराठी भक्तीगीते, भावगीते, श्लोक, छत्रपती शिवरायांचे पोवाडे आणि कथा ऐकवते. ती सर्व गोष्टी मन लावून ऐकून त्याचे अनुकरण करायचा प्रयत्न करते.’’ आज भारतात रहाणारे किती पालक असे करतात ?
चि. वेदांशी आणि तिच्या आई-वडिलांकडून भारतातील सर्वच पालकांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा. सद्यःस्थितीत स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांचे प्रमाण पहाता स्त्रियांनी स्वतःमधील क्षात्रवृत्ती जागवून रणरागिणी होण्याची आवश्यकता आहे. वेदांशीप्रमाणे मुलींवर लहानणापासूनच शौर्याचे संस्कार असतील, तर ती कुणाही आफताब पूनावाला किंवा इक्बालच्या षड्यंत्राला बळी पडणार नाही आणि पुढची पिढी नक्कीच राष्ट्र-धर्मप्रेमी होईल !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे